श्रीवर्धन महसूल कर्मचा-यांचे काम बंद , तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:59 AM2017-10-11T02:59:14+5:302017-10-11T03:03:24+5:30
येथील तहसीलमधील कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले.
श्रीवर्धन : येथील तहसीलमधील कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले.
महसूल कर्मचारी संघटनेने ६ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाबाबत निवेदन दिले होते. महसूल कर्मचाºयांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या, महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक करणे, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड ४८०० करणे, शिपाई संवर्गातून तलाठी पदोन्नती मिळण्याबाबत, नायब तहसीलदार सरळ सेवा भरतीची पदे ३३ टक्केवरून २० टक्के करून पदोन्नती प्रमाण ८० टक्के पदे करणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने २०१२, २०१३, २०१४, २०१५ या वर्षांत महसूल कर्मचारी वर्गाने विविध आंदोलने केली. ६ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री महसूलमंत्री व वरिष्ठ मंत्रालयीन पातळीवर मागण्या मान्य करण्यात आल्या; परंतु अद्याप शासन निर्णय पारित झाला नाही, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. रायगड जिल्हात या महिन्यात वादळी पाऊस झाल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीसंदर्भात विविध कामे महसूल विभागाशी निगडित असतात. अगोदरच शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे, त्यामध्ये या आंदोलनाने मानसिक त्रासात निश्चित वाढ होणार आहे.