श्रीवर्धन क्रीडा संकुल रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 01:09 AM2021-03-09T01:09:28+5:302021-03-09T01:09:47+5:30
आश्वासन विरले हवेत : दोन महिने उलटूनही कामे ‘जैसे थे’
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : श्रीवर्धन तालुक्याचे बोर्लीपंचतन येथील क्रीडा संकुल येत्या दोन महिन्यात पूर्ण करणार, असे नेहमीच सांगण्यात येते; मात्र डिसेंबरनंतरही दोन महिने उलटून गेले तरी कोणत्याही प्रकारची कामे सुरू झाली नसल्याचे समोर आले आहे.
श्रीवर्धनच्या क्रीडा संकुलाचे ३ मे २०१३ रोजी भूमिपूजन करण्यात आले व २०१४ साली प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. या कामाचे कंत्राट श्रीवर्धनमधील सिरोया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. क्रीडा खात्यामार्फत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे टप्प्याटप्प्याने आजपर्यंत ५५ लाख रुपये वर्ग झाले आहेत. मागील वर्षभर क्रीडा संकुलाचे काम बंद आहे. भूमिपूजनानंतर काम ६ वर्षे सुरू असल्याने ठेकेदाराचे अन्य ठिकाणी काम चालू असल्याने येथील कामाकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराशी आर्थिक हितसंबंध तर नाही ना, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. गेल्या सात वर्षांपासून श्रीवर्धनमधील क्रीडा संकुलचे काम सुरू आहे; मात्र अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. हे काम पूर्णत्वास केव्हा जाणार, असा प्रश्न परिसरातील क्रीडा प्रेमींना पडला आहे. ठेकेदारास सार्वजनिक बांधकाम खाते पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.
श्रीवर्धन येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता श्रीकांत गणगणे यांच्याशी याबाबत बोलले असता, क्रीडा संकुलसाठी १ कोटी आल्याचे सांगितले; मात्र कामे अद्यापही सुरू झाली नाहीत, हे विचारले असता करू, बघू, असे बोलत कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही.
मंत्र्यांची पाठ, अधिकारी सुसाट
मंत्री आले की त्यांच्या भोवती वही घेऊन फिरण्याची अधिकाऱ्यांची जुनी पद्धत. बैठकीत काही नोंदी टिपून घेणे आणि बैठक संपल्यावर मात्र अधिकारी त्याकडे 'वेळे'नुसार आणि 'निधी'नुसार लक्ष देतात, हे आता जगजाहीर आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी असेच केले असावे, असे बोलले जाते.