नवी मुंबई : काँगे्रसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यामागील अनधिकृत बांधकामांचे शुक्लकाष्ट सुरूच आहे. २०१२ मध्ये सेंट झेवियर्स शाळेतील अनधिकृत बांधकामावरील कारवाईस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याविषयीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणार आहे. नेरूळमधील सेंट झेव्हियर्स शाळेने केलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने २९ मे रोजी कारवाई केली होती. सदर कारवाई सुरू असताना प्रभाग ७२ चे तत्कालीन नगरसेवक संतोष शेट्टी यांनी घटनास्थळी जावून कारवाई थांबविण्यास सांगितले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सय्यद पीर फकिरा यांनी केली होती. याविषयी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने याविषयी निर्णय घेण्यासाठीचे आदेश महापालिका आयुक्तांना आॅगस्ट २०१४ मध्ये दिला होता. याविषयी आयुक्तांकडे चार वेळा सुनावणी झाली आहे. नगरसेवक पद रद्द करणे ही आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रातील गोष्ट नाही. यामुळे याविषयी निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचे कामकाज म्हणून संतोष शेट्टींना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. परंतु सभा तहकूब झाल्यामुळे सदर विषय पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वीही कार्यालय व खारघरमधील थ्री स्टार हॉटेलमधील अतिक्रमणाचा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत आला होता. परंतु त्यावर निर्णय झाला नव्हता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये शेट्टी यांचा पराभव झाला आहे. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असून सर्वसाधारण सभा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संतोष शेट्टींच्या मागे अतिक्रमणाचे शुक्लकाष्ट
By admin | Published: June 21, 2015 2:09 AM