नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सहाही कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता. शनिवार असल्यामुळे एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. प्रमुख पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत व ज्यांची उमेदवारी निश्चित झालेल्यांनी चांगल्या मुहूर्ताचा शोध सुरू केला आहे. यामुळे २ ते ६ मे दरम्यानच सर्व अर्ज भरले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणूक रिंंगणात असले, तरी खरी लढत शेतकरी कामगार पक्ष व भारतीय जनता पक्षामध्ये असणार आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये प्रमुख पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत उमेदवार कोण, बंडखोरी कोण करणार, कोण कोणत्या पक्षाच्या आश्रयाला जाणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी कोण अर्ज भरणार? याकडेही लक्ष लागले होते; पण दिवसभर सहाही कार्यालयांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला होता. दिवसभरामध्ये एकही उमेदवाराने अर्ज भरला नाही. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी निश्चित केलेली नाही. लवकर उमेदवार निश्चित झाल्यास बंडखोरी होण्याची भीती असल्याने २ मे नंतरच प्रत्यक्षात यादी जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. वादग्रस्त नसलेल्या प्रभागांमधील उमेदवार प्रथम अर्ज भरतील. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आहे त्या प्रभागांमधील अर्ज शेवटच्या दोन दिवसांत भरले जाणार आहेत. पहिल्या दिवशी शनिवारी असल्याने कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. २० प्रभागांमध्ये ७८ जागांसाठी निवडणूक होत आहे. ५००पेक्षा जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. रविवार व सोमवारी महाराष्ट्र दिन यामुळे अर्ज दाखल होणार नाहीत. चार ते पाच दिवसांत सर्व अर्ज दाखल होणार असल्याने निवडणूक कार्यालयामधील कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडणार आहे. शेवटच्या दोन दिवसांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याचीही शक्यता आहे. अर्ज भरताना कोणताही गोंधळ होऊ नये व सर्वांना अर्ज भरता यावेत, यासाठी वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार असून राजकीय पक्षांच्या प्रमुखांना विश्वासात घेण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)चांगला मुहूर्त कोणतानिवडणूक सुरू झाल्यापासून अनेक इच्छुक उमेदवारांनी देवदर्शनावर लक्ष केंद्रित केले आहे. उमेदवारी मिळण्यापासून ते जिंकण्यासाठी नवस बोलले जात आहेत. यामुळे अर्ज भरण्यासाठीही चांगल्या मुहूर्ताचा शोध घेतला जात आहे. चांगला दिवस व वेळ पाहूनच अर्ज भरण्याचे अनेकांनी निश्चित केले आहे.
पहिल्या दिवशी निवडणूक कार्यालयामध्ये शुकशुकाट
By admin | Published: April 30, 2017 4:01 AM