जलवाहिनी दुरुस्तीचा शटडाउन ७२ तासांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:08 AM2019-01-25T00:08:04+5:302019-01-25T00:08:14+5:30
हेटवणे धरणातील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सिडकोच्या वतीने २२ जानेवारी रोजी २४ तासांचा शटडाउन घेतला होता.
पनवेल : हेटवणे धरणातील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सिडकोच्या वतीने २२ जानेवारी रोजी २४ तासांचा शटडाउन घेतला होता. मात्र, हा शटडाउन सुमारे ७२ तासांवर गेल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. उलवे नोडसह खारघर शहरात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
खारघर शहरात शटडाउनचा सर्वात जास्त फटका बसला. तीन लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. अनेकांना विकत पाणी घ्यावे लागले. विशेष म्हणजे सिडकोच्या शून्य नियोजनाची प्रचिती नागरिकांना आली. खारघर शहरासह कोपरा, मुर्बी, बेलपाडा गावातही शटडाउनचा परिणाम झाला. खारघर शहरातील सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी निखिल यादव यांना विचारणा केली असता, सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत ते कोणतीही माहिती देऊ शकले नाही.
हमरापूर ते जीते येथे दरम्यान जलवाहिनी जोडताना स्थानिक पातळीवर समस्या उदभवली होती. त्यामुळेच 24 तासांचा शटडाऊन उशिरापर्यंत गेला. गुरु वारी उशिरापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे सिडकोमार्फत सांगण्यात आले. खारघर, द्रोणागिरी, तसेच उलवे नोडसह हेवटणे धरणापासून सुरु झालेल्या जलवाहिनीवर अवलंबून सुमारे १०० गावांना अपुरा पाणी पुरवठ्याचा फटका बसल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.
>खारघरमध्ये दूषित पाणीपुरवठा
खारघर सेक्टर १२ मधील धनलक्ष्मी सोसायटीत बुधवारी सायंकाळी अचानक दूषित पाणीपुरवठा झाला. एकीकडे पिण्यासाठी पाणी नसताना दूषित पाणीपुरवठा सुरू झाल्याने रहिवाशांनी सिडकोविरोधात नाराजी व्यक्त केली. या सोसायटीत अनेक रहिवासी दूषित पाणी पिल्याने आजारी देखील पडले आहे. जीर्ण झालेल्या जलवाहिनीत गटारातील पाणी मिसळल्याने हा दूषित पाणीपुरवठा झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.