जयंत धुळप
अलिबाग - अलिबाग जवळच्या वेश्वी गावांतील स्वराली वैभव मगर या तीन वर्षाच्या मुलीच्या -हदयावर शस्त्रक्रीया करणे आवश्यक असल्याचे मुंबईतील रुग्णालयाने निश्चित केले परंतू त्याकरीता येणारा खर्च हा स्वरालीच्या कुटूंबियांना आर्थिक दृष्टय़ा परवडणारा नसल्याने, श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळावी अशी विनंती अलिबागेतील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र साळवी यांनी गेल्या ९ ऑक्टोबर रोजी ट्रस्ट कडे केली होती. ती मान्य करुन स्वरालीच्या -हदय शस्त्रक्रीये करिता तीच्या संबंधीत रुग्णालयाकडे वैद्यकीय आर्थिक सहाय्याचा धनादेश रवाना करण्यात आला असल्याची माहिती मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष व अलिबागचे सुपूत्र अभिनेते आदेश बांदेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
सिद्धविनायकाचे गरजू रुग्णाना ख:या अर्थाने आशिर्वाद
गेल्या तीन महीन्यांपूर्वी बांदेकर यांनी श्री सिद्धीविनायक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली. या तिन महिन्यांच्या कालावधीत सिद्धीविनायकाचे तब्बल १ हजार २८० गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा आशिर्वाद प्राप्त झाले आहेत. राज्यातील या विविध ठिकाणच्या १ हजार २८० गरजू रुग्णांना त्यांच्या शस्त्रक्रीयांकरिता एकूण २ कोटी ८३ लाख रुपयांचे वैद्यकीय आर्थिक सहाय्य देण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगीतले. सिद्धविनायकाचे गरजू रुग्णाना ख-या अर्थाने लाभलेले हे आशिर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डायलेसीस सेंटर्सचा मनोदय
डायलेसीस ही अलिकडच्या काळात अत्यंत गरजेची वैद्यकीय सेवा झाली आहे. त्याकरिता रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी डायलेसीस सेंटर्स सुरु करण्याचा मनोदय ट्रस्टचा आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवशी यांच्या समवेत या बाबत प्राथमिक चर्चा देखील झाली आहे. येत्या काळात ही सेवा गरजू रुग्णांकरीता वास्तवात उतरेल असा विश्वास बांदेकर यांनी अखेरीस व्यक्त केला आहे.