अनधिकृत झोपड्यांनी व्यापले पदपथ, कोपरखैरणेतला प्रकार, परिसराला आली अवकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 01:13 AM2020-12-06T01:13:46+5:302020-12-06T01:14:30+5:30
Navi Mumbai News : नवी मुंबईत अनधिकृत झोपड्यांचे पेव वाढतच चालले आहे. त्यात भिकाऱ्यांच्या वस्त्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून वस्त्या उभारल्या जात असल्याने, यामागे कटकारस्थान असल्याचीही शक्यता आहे.
नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगतच अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून पदपथ व्यापण्यात आले आहेत. यामुळे परिसराला अवकळा आली आहे.
नवी मुंबईत अनधिकृत झोपड्यांचे पेव वाढतच चालले आहे. त्यात भिकाऱ्यांच्या वस्त्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून वस्त्या उभारल्या जात असल्याने, यामागे कटकारस्थान असल्याचीही शक्यता आहे. असाच प्रकार कोपरखैरणे येथे रेल्वे स्थानकालगत पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरू असताना झालेल्या विरोधामध्ये पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्यानंतर बळाचा वापर करून भूखंड मोकळा करण्यात आला. मात्र, भूखंडावरून हटवलेल्या झोपड्या पदपथावर उभारण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे.
या मार्गाने ये-जा करणाऱ्यांची अडवणूक करून भीक मागणे, मद्यपान करून रस्त्यावर हाणामारी करणे असे प्रकार रात्रंदिवस त्या ठिकाणी सुरू असतात. यामुळे संपूर्ण परिसराला अवकळा आली आहे, तर झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांकडून संपूर्ण परिसरात कचराही पसरवला जात आहे. यामुळे स्वच्छता अभियानाचाही बोजवारा उडत आहे. त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भात अनेकांकडून प्रशासन दरबारी तक्रार करण्यात आलेली आहे. यानंतरही दोन वर्षांत तिथली झोपडपट्टी हटवणे प्रशासनाला अवघड जात असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
मोक्याची जागा घेतली
ज्या ठिकाणी या झोपड्या थाटण्यात आल्या आहेत, ती मोक्याची जागा आहे. यामुळे अर्थपूर्ण उद्देशाने परिसराला गलिच्छ दर्शविण्याच्या उद्देशाने झोपड्यांना अभय दिले जात असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.