महापे औद्योगिक नगरीत रस्त्यांची चाळण; मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 12:25 AM2021-01-26T00:25:02+5:302021-01-26T00:25:24+5:30
अनेक ठिकाणी विविध कामांसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात न आल्यामुळे आजही परिस्थिती जैसे थे आहे.
नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक नगरी म्हणून ठाणे-बेलापूर टीटीसी एमआयडीसी या नावाने नवी मुंबई शहराची ओळख आहे. येथे रस्ते, गटारे, डेब्रिज, मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे वाढते अतिक्रमण, ड्रेनेजच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे महापे टीटीसी, एमआयडीसी परिसरातील कारखान्यांचे उद्योजक तसेच हजारो कामगारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
महापे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी लाखो रुपयांची निविदा मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही रस्ते बनवले नाहीत. अशी येथील चाकरमान्यांची तक्रार आहे. येथील एनएमएमटी बस डेपोला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने अनेक लहानमोठी वाहने चिखलात अडकून पडली आहेत. अनेक ठिकाणी कारखान्यांच्या मलनिस्सारण वाहिन्या आणि पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या फुटल्यामुळे हेच पाणी खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचत आहे. अनेक ठिकाणी विविध कामांसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात न आल्यामुळे आजही परिस्थिती जैसे थे आहे.
मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांचे वास्तव्य
आनंदनगर सोसायटीच्या मोकळ्या भूखंडांवर २०० ते २५० अनधिकृत झोपड्यांची संख्या असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत असून या झोपडपट्टी वासियांकडून होणारी अस्वच्छता व त्यामुळे होणारा डासांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या बनली आहे. झोपड्यांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे लोक वास्तव्यास असल्यामुळे चोऱ्या आणि मारामारीचे प्रकार नेहमीच घडत असल्याचे सांगण्यात येते. या दैनंदिन प्रकारामुळे येथील उद्योजक तसेच नोकरी व्यवसायानिमित्त येथून येणारे-जाणारे चाकरमानी बेजार झाले आहेत.