सिग्नल तोडला तर दंडाची पावती थेट तुमच्या घरी : १९ कॅमेरे कार्यान्वित

By नारायण जाधव | Published: February 6, 2023 07:59 PM2023-02-06T19:59:09+5:302023-02-06T19:59:23+5:30

१५०० पैकी ४९४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम पूर्ण

Signal breaking fine receipt directly to your home : 19 cameras operational | सिग्नल तोडला तर दंडाची पावती थेट तुमच्या घरी : १९ कॅमेरे कार्यान्वित

सिग्नल तोडला तर दंडाची पावती थेट तुमच्या घरी : १९ कॅमेरे कार्यान्वित

Next

नवी मुंबई : नवी मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाने गती पकडली आहे. शहरात आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
१५०० हून अधिक कॅमेरे बसविण्यात येत असून आतापर्यंत ४८४ कॅमेरे बसविले आहेत. यातील १९ कॅमेरे प्रायोगिक स्वरुपात कार्यान्वित केले असून त्याची तपासणी सुरू आहे.

याशिवाय पोलिसांठी अत्यंत महत्त्वाचे असे ९६ इव्हिडन्स कॅमेरे २४ मुख्य चौकात बसविण्यात येत आहेत. साेबत २८८ एएनपीआर म्हणजेच ॲटोमॅटिक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरेही बसविण्यात येत असल्याने कुणी वाहनचालकाने सिग्नल तोडला, वाहतूक नियमांचा भंग केला तर थेट त्याच्या घरीच थेट दंडात्मक चलन फोटोसह पाठविले जाणार आहे.

या कामाची प्रत्यक्ष पाहणी शहर अभियंता संजय देसाई तसेच अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत केली व काम गतिमानतेने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

५४० ठिकाणांवर वॉच
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५४० स्थानांवर प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, नमुंमपा कार्यालये, पामबीच, ठाणे बेलापूर रोड, सायन पनवेल असे जास्त रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेशन कॅमेरे आहेत. यामध्ये ९५४ फिक्स्ड कॅमेरे तसेच ३६० अंशामध्ये गोलाकार चित्रण टिपणारे १६५ पीटीझे़ड कॅमेरे बसविण्यात येत आहेत.

सागरी सुरक्षेसाठी ९ थर्मल कॅमेरे
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला लाभलेला विस्तारित सागरी किनारा लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ९ थर्मल कॅमेरे बसविण्यात येत आहेत.

तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष
या सीसीटीव्ही प्रणालीच्या मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारणीचे काम नमुंमपा मुख्यालय येथे सुरू असून हा नियंत्रण कक्ष नवी मुंबई पोलिस आयुक्तालय येथील विशेष कक्षाशी जोडलेला असणार आहे. अशाच प्रकारचा निरीक्षण कक्ष वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालय तसेच पोलिस उपायुक्त परिमंडळ १ यांचे कार्यालयातही असणार आहे.

महिनाभराची संग्रहण क्षमता
या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाची नियंत्रण कक्षातील संग्रहण क्षमता ३० दिवसांची असणार असून या प्रणालीमध्ये महत्त्वाचे प्रसंग, घटना यांचे सीसीटीव्ही चित्रीकरण स्वतंत्रपणे संग्रहण करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पोलिस आयुक्तांनी घेतला आढावा
सीसीटीव्ही प्रणालीच्या कामाबाबत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस आयुक्तालय स्तरावरही ३ फेब्रुवारी रोजी आढावा बैठक झाली. असून त्यामध्ये ही कार्यप्रणाली अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करून ही यंत्रणा अधिक चांगल्या रितीने वापरात आणण्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागास निर्देशित केले आहे.

२४ ठिकाणी सार्वजनिक घोषणा प्रणाली
यासोबतच २४ वाहतूक बेटांवर सार्वजनिक घोषणा प्रणाली बसविण्यात येत असून याद्वारे आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षणी नागरिकांकरिता नियंत्रण कक्षातून महत्त्वाच्या सूचना देणे शक्य होणार आहे. यामुळे आणीबाणीच्या वेळी संपूर्ण शहरवासीयांना एकाच वेळी महत्त्वाचे संदेश देणे सोपे हाेणार आहे. यातून महापालिकेच्या निधीची मोठी बचत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानासह पाणीकर, मालमत्ताकर भरण्यासह पाण्याचे शटडाऊन, पोलिसांकडून होणारे वाहतूक बदल अशा सूचना देता येणे सोपे होणार आहे.

Web Title: Signal breaking fine receipt directly to your home : 19 cameras operational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.