नवी मुंबई : पादचा-यांच्या सोयीसाठी महापालिकेने विदेशी संकल्पनेनुसार शहरात अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसवण्याला सुरुवात केली आहे. प्राथमिक स्वरुपात सात ठिकाणी ही यंत्रणा अवगत करण्यात आली असून त्यामुळे सिग्नलचा रिमोट पादचा-यांच्या हाती आला आहे. त्यामुळे अनावश्यक वेळी सिग्नल लागणार नसल्याने वाहन चालकांनाही दिलासा मिळणार आहे.शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीचीही समस्या वाढत चालली आहे. चौकांमध्ये वाढते अपघात टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. त्यानंतरही पादचाºयांची गैरसोय होत असून वेगवान वाहनांचीच दहशत वाढत चालली आहे. त्यावर पर्याय म्हणून पालिकेने सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यास सुरवात केली आहे. त्याकरिता पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी विभागामार्फत पादचारी नियंत्रक पथसंकेत ही संकल्पना राबवण्यात आली आहे. या संकल्पनेतून शहरातील सात महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नलचा रिमोट पादचाºयांच्या हाती देण्यात आला आहे. आजवर ही संकल्पना दुबई, सिंगापूर तसेच मलेशिया अशा तंत्रज्ञानाने अद्यावत देशांमध्ये पहायला मिळत होती. हेच तंत्रज्ञान वापरुन महापालिकेनेही पादचाºयांच्या सोयीनुसार सिग्नल लागून वाहने थांबतील याची काळजी घेण्याला सुरवात केली आहे.कोपरखैरणेतील डी मार्ट चौक, स्वामी विवेकानंद चौक, ऐरोलीतील पुरुषोत्तम खेडकर चौक, स्वामी समर्थ चौक तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर मुकुंद कंपनीसमोर, भारत बिजली चौक आणि रबाळे जंक्शन याठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्याठिकाणी पादचाºयांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा खांबावर बटण बसवण्यात आले आहे. पादचाºयाने ते बटण दाबल्यास ठरावीक वेळाने लाल सिग्नल लागल्यानंतर पादचाºयांना मार्ग खुला होईल. तर जेव्हा रस्ता ओलांडण्यासाठी पादचारीच नसतील तेव्हा मात्र वाहन चालकांना अनावश्यक थांबावे लागणार नाही. ही सिग्नल नियंत्रक यंत्रणा सुविधा पादचाºयांच्या रस्त्यावरील चालण्याचा हक्क अबाधित राखण्याकरिता बसवण्यात आली आहे. ज्याठिकाणी शाळा, रुग्णालये अथवा पादचाºयांची वर्दळ जास्त असते, अशा ठिकाणी ही यंत्रणा अधिक उपयुक्त ठरणार आहे. आगामी काळात शहरातील सर्वच सिग्नलवर ही यंत्रणा उपलब्ध होवून शहराची आधुनिकतेकडे झालेली आगेकूच पहायला मिळणार आहे.
सिग्नलचा रिमोट पादचाऱ्यांंच्या हाती, सात ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:51 AM