नवी मुंबईकरांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी स्वाक्षरी मोहीम
By योगेश पिंगळे | Published: January 31, 2024 05:56 PM2024-01-31T17:56:41+5:302024-01-31T17:58:32+5:30
वाशीतील पालिका रुग्णालयासमोर आयोजन.
योगेश पिंगळे, नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे शहरातील रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याविरोधात नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने वाशीतील महापालिका रुग्णालयासमोर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या मोहिमेतून रुग्णालय प्रशासनाला आणि महानगरपालिकेला थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत.
कोरोना काळात प्रशासनाच्या गलथान कारभाराला नागरिकांनी सहन केले. मात्र, आता सरकारी रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी कोणी अडवले? आणखी किती दिवस नवी मुंबईतील सरकारी रुग्णालयातून रुग्णांना खासगी रुग्णालयांत पाठविणार? सर्वसामान्य नवी मुंबईकर हक्काच्या आरोग्य व्यवस्थेपासून किती दिवस वंचित राहणार? यासारखे विविध प्रश्न यावेळी महापालिका प्रशासनाला करण्यात आले. या मोहिमेत तब्ब्ल ७५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. आरोग्याच्या मुद्द्यावरून अशाच प्रकारे आवाज उठविणार असून, नवी मुंबईकरांच्या हक्काच्या आरोग्यवस्थेसाठी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
या स्वाक्षरी मोहिमेला नवी मुंबईचे माजी महापौर अविनाश लाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नासीर हुसैन, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूनम पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उज्ज्वला सावळे, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी दीप काकडे, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बनसोडे, सुनील किंद्रे, अभिषेक पाटील, सूरज देसाई, सीताराम शिरसाट, बाळकृष्ण बैले, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.