आंबेडकर स्मारकासाठी मूक निदर्शने
By admin | Published: January 28, 2017 03:05 AM2017-01-28T03:05:59+5:302017-01-28T03:05:59+5:30
ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी
नवी मुंबई : ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वाशीमध्ये मूक निदर्शने केली. मार्बलला विरोध करून स्मारकाचे काम जाणीवपूर्वक रखडविण्यात आले आहे. नागरिकांमध्ये असंतोष असून आता मूक निदर्शने केली असली तरी भविष्यात राज्यभर आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
वाशीतील शिवाजी चौकामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून व हातामध्ये निषेधाचे फलक घेवून नवी मुंबईमध्ये लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचे शहरवासीयांच्या निदर्शनास आणून दिले. सभागृहाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक रखडविले जात असून त्यांनी लिहिलेल्या घटनेने दिलेल्या अधिकारांचीही पायमल्ली होत असल्याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
आंबेडकर स्मारकाविषयी उग्र आंदोलनाची मागणी नागरिकांकडून होत आहे. पदाधिकाऱ्यांच्या भावनाही तीव्र आहेत. तरीही सर्वप्रथम आयुक्तांना विनंती केली. सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली. पण यानंतरही काहीच कार्यवाही झाली नाही. आतातरी प्रशासनाने हट्ट सोडावा अन्यथा आंबेडकरी जनतेचा संयम सुटेल व त्यानंतर उग्र निदर्शनाला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मोर्चात राष्ट्रवादी काँगे्रसचे नवी मुंबई अध्यक्ष अनंत सुतार, शिवराम पाटील, सुरेश कुलकर्णी, संजू वाडे, अंकुश सोनावणे, सिद्राम ओहोळ, शुभांगी पाटील, रंजना सोनावणे व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)