‘संथारा’ प्रथेवरील बंदी हटवण्यासाठी मूक मोर्चा

By admin | Published: August 25, 2015 01:01 AM2015-08-25T01:01:27+5:302015-08-25T01:01:27+5:30

‘संथारा’ प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेली बंदी उठवण्यासाठी सोमवारी देशभर जैन समाजाने मूक मोर्चा काढला. त्यानुसार नवी मुंबईतही वाशी ते कोपर

Silent Front to remove ban on 'Santhara' practice | ‘संथारा’ प्रथेवरील बंदी हटवण्यासाठी मूक मोर्चा

‘संथारा’ प्रथेवरील बंदी हटवण्यासाठी मूक मोर्चा

Next

नवी मुंबई : ‘संथारा’ प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेली बंदी उठवण्यासाठी सोमवारी देशभर जैन समाजाने मूक मोर्चा काढला. त्यानुसार नवी मुंबईतही वाशी ते कोपरखैरणेदरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये जैन समाजाच्या शेकडो बांधवांनी सहभाग घेतला होता.
सल्लेखना/ संथारा ही आत्महत्या नसून धर्म साधना असल्याची भावना जैन समाजात आहे. त्यानुसार जीवनाच्या अखेरच्या क्षणी अन्नत्याग करून मृत्यू स्वीकारण्याची प्रथा जैन धर्माच्या सर्वच समाजात आहेत. परंतु राजस्थानच्या उच्च न्यायालयाने संथारा प्रथेला आत्महत्या ठरवत त्यावर बंदी आणली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी जैन समाजाच्या वतीने देशभर मूक आंदोलन करण्यात आले. संथारावर लादलेल्या बंदीचा फेरविचार व्हावा असे जैन धर्माच्या दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी या जैन धर्मातील सर्वच समाजाचे म्हणणे आहे. यानुसार त्यांच्या भावना शासनापर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेकडो जैन बांधवांनी सहभाग घेतला होता. वाशीतील जैन मंदिरातून निघालेला हा मूक मोर्चा वाशी शिवाजी चौक येथून कोपरखैरणेपर्यंत पायी चालत काढण्यात आला. त्यामध्ये माजी खासदार संजीव नाईक यांनीही जैन धर्मीयांना पाठिंबा दर्शवत मूक मोर्चात सहभाग घेतला. मूक मोर्चाच्या या पदयात्रेत लहान मुलांसह, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या.
सल्लेखना/ संथारा ही जैन धर्माची साधना मानले जाते. सूक्ष्म जीवालाही आघात होवू नये अशी जैन धर्माची भावना असते. परंतु जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत धर्माचे साधक राहण्यासाठी स्वईच्छेने अनेक जण संथारा करतात. ही आत्महत्या किंवा इच्छामरण नसल्याचे समाजाचे म्हणणे आहे. परंतु याची प्रक्रिया व उद्देश समजून न घेताच राजस्थान न्यायालयाने त्यावर बंदीचा घेतलेला निर्णय जैन समाजावर अन्यायकारक असल्याचेही समाज प्रमुखांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयावर न्यायालयाने फेरविचार घ्यावा याकरिता जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शांतीनाथ जांगडे, लवकेश जैन, प्रवीण शहा, राजेश शहा, नरेशभाई संघवी, अशोक डांगी, राजावत, सुभाष मगदूम, नीलेश गाला आदी प्रामुख्याने उपस्थित
होते.
कोपरखैरणे सेक्टर २ येथून बसद्वारे हा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्याठिकाणी समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. संथारा ही आत्महत्या नसून धर्माचे वृत असल्याने त्यावरील बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Silent Front to remove ban on 'Santhara' practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.