नवी मुंबई : महापालिकेच्या घणसोली सद्गुरू हॉस्पिटल ते घणसोली सेक्टर १ ते ९ नोड्समधील नाल्यांची सफाई न करण्यात आल्याने नाल्यांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. घाणीच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी घणसोली नोड्स परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
घणसोली गावातील अर्जुन वाडीपासून सद्गुरू रुग्णालय मार्गे थेट खाडीत रासायनिक कंपन्यांचे दूषित सांडपाणी वाहून नेणारा मोठा नाला आहे. घणसोली सेक्टर ९ च्या नाल्यात भटकी मेलेली कुत्री सडून गेल्याने दुर्गंधीचा वास या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासाठी महापालिकेच्या संबंधित खात्याने घटनास्थळी या नाल्यांची पाहणी करून त्वरित कार्यवाही करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होते, परंतु ही नालेसफाई म्हणजे वरवर असलेला कचरा आणि नाल्याच्या कडेला दुतर्फा असलेला कचरा साफ करणे अशी कामे महापालिकेच्या मार्फत करण्यात आली आहेत. नाल्यातील संपूर्ण गाळ काढून चिखलासह दगड तसेच डेब्रिज काढण्याची आवश्यकता असूनही केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे, असे येथील नागरिक गणेश सकपाळ यांनी सांगितले.