बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड
By admin | Published: April 17, 2017 04:22 AM2017-04-17T04:22:11+5:302017-04-17T04:22:11+5:30
बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड चालू करणाऱ्या इतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यात संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्याचाही समावेश आहे
नवी मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड चालू करणाऱ्या इतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यात संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्याचाही समावेश आहे. प्रतिपेपर अवघ्या पाच रुपयांसाठी त्याने टाटा डोकोमोच्या डिस्ट्रिब्युटरला बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे समोर आले आहे.
कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे मोबाइल सिमकार्ड चालू करणाऱ्या टोळीचा भांडाफोड गुन्हे शाखा कक्ष-२च्या पथकाने केला आहे. या प्रकरणी विजय यादव व सतीश गायकवाड (३२) या दोघांच्या अटकेनंतर त्यांच्या इतर दोघा साथीदारांनाही नुकतीच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये बनावट कागदपत्रे बनवणाऱ्याचाही समावेश असून शरीफ खान (२९) असे त्याचे नाव आहे. तो उलवेचा राहणारा असून, त्याने प्रत्येक प्रतिपेपर पाच रुपयांसाठी या कटात सहभाग घेतल्याचे तपासात समोर आले आहे. याकामी रामविनय यादव (२४) याने त्याला मदत केल्याने त्यालाही चेंबूरमधून अटक करण्यात आली आहे. सध्या मोबाइल नेटवर्क कंपन्यांमध्ये ग्राहक मिळवण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेतून हा प्रकार घडला आहे. सिमकार्ड डिस्ट्रिब्युटर्स व सेल्स मॅनेजर यांना कंपन्यांकडून टार्गेट दिली जात असून ते पूर्ण करणाऱ्यास आर्थिक मोबदला दिला जातो. त्यानुसार टाटा डोकोमो कंपनीचे प्रतिमहिना २१०० सिमकार्ड विक्रीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी विजय व सतीश यांनी हा प्रकार केला. त्याकरिता शरीफ हा त्यांना बनावट कागदपत्रे बनवून द्यायचा. तर त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे सुरू केलेली १२२० सिमकार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत. शरीफचा झेरॉक्सचा व्यवसाय असल्याने ग्राहकाच्या आधारकार्डची एक झेरॉक्स प्रत स्वत:कडे ठेवून घ्यायचा. संगणकावर त्यात फेरफार करून नाव व पत्त्यात बदल करून बनवलेल्या बनावट आधार कार्डची प्रत रामविजयच्या माध्यमातून सतीशपर्यंत पोहोचवायचा. याकरिता सतीश गायकवाड हा प्रतिपेपर सात रुपये द्यायचा. त्यापैकी दोन रुपये स्वत:ला ठेवून रामविजय हा उर्वरित पाच रुपये शरीफला द्यायचा. त्यानंतर विजय व सतीश हे दोघे बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्डची विक्री झाल्याचे भासवून स्वत:कडील मोबाइलमधून ते सुरू करायचे; परंतु टाटा डोकोमो कंपनीच्या अधिकाऱ्यांना बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड घेतल्याचे निदर्शनास आल्याने तक्रार केली.