सिंगल पॅरेंट्सच्या मुलाला प्रवेश नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:58 AM2019-06-16T01:58:38+5:302019-06-16T01:59:38+5:30
शाळेचा अजब फतवा; पालकांमध्ये संताप; कारवाईची मागणी
नवी मुंबई : वाशी येथील सेंट लॉरेन्स या खासगी शाळेने अजब फतवा काढला असून, सिंगल पॅरेंट्स असल्याने पाल्यांना शाळेत प्रवेश दिला जात नाही. या शाळेच्या मुख्याध्यापिकेने सिंगल पॅरेंट्स असलेल्या सुजाता मोहिते या महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश देण्याबाबत नकार दिला असून मुख्याध्यापिकेच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाळेच्या या फतव्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबई शहरात खासगी संस्थांच्या शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अटी-शर्ती लागू केल्या जात असल्याने त्याचा नाहक मनस्ताप पालकांना सहन करावा लागत आहे. याचेच एक उदाहरण समोर आले असून वाशीतील सेंट लॉरेन्स या खासगी शाळेत जागा शिल्लक असतानाही मोहिते या महिला सिंगल पॅरेंट्स असल्याने त्यांच्या पाल्याला प्रवेश नाकारण्यात आला आहे. मोहिते यांनी प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले असता सिंगल पॅरेंट्सला प्रवेश दिला जात नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकेने सांगितले असून, याबाबतचा व्हिडीओ या महिलेने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. मुलांना शाळेत प्रवेशासाठी शाळा प्रशासन असे मनमानी अटी-शर्ती लागू करीत असल्यास विभक्त झालेल्या किंवा हयात नसलेल्या पालकांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे की नाही, असा सवाल पालक उपस्थित करू लागले आहेत. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेची प्रतिक्रि या घेण्यासाठी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
सिंगल पॅरेंट्समुळे आम्हाला खूप समस्या येतात, त्या हॅण्डल होत नसल्याचे मुख्याध्यापिकेने म्हटले आहे. प्रवेशानंतर पालक विभक्त झाल्यास काय? असा सवाल या मोहिते यांनी मुख्याध्यापिकेला केला असता, ‘त्याला मी जबाबदार नाही’ असे उत्तर मुख्याध्यापिकेने दिले असल्याचे कॅमेºयात बंदिस्त झाले.