सायन-पनवेल महामार्ग जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:15 AM2018-06-26T02:15:46+5:302018-06-26T02:15:50+5:30

सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्ग जलमय झाला होता.

Sion-Panvel Highway | सायन-पनवेल महामार्ग जलमय

सायन-पनवेल महामार्ग जलमय

googlenewsNext

पनवेल : सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्ग जलमय झाला होता. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. विशेष म्हणजे पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे कल्वर्ट अनेक ठिकाणी बंद असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्सूनपूर्व नियोजन न झाल्याने महामार्गावर पाणी साचल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणासाठी १२00 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरसुध्दा या महामार्गावर वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महामार्गावर कळंबोली, कामोठे दरम्यान सोमवारी तीनही लेन पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडल्याचे प्रकार घडले. तसेच महार्गावरील खारघर, हिरानंदानी, बेलपाडा, उरण फाटा या ठिकाणीही पाणी साचले होते. पहिल्याच पावसात महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अगोदरच वाहनधारकांची कसरत होत आहे. यातच मागील दोन दिवसांपासून पावसाने झोडपल्याने महामार्गाची चाळण झाली आहे. तुर्भे उड्डाणपुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यात पावसाचे पाणी साचून त्याचे मोठ्या डबक्यात रूपांतर झाले आहे. वाहनधारकांना याचा अंदाज येत नसल्याने त्यात वाहने आपटून लहान-मोठे अपघात होत आहे. दरम्यान, सोमवारी तुर्भे उड्डाणपुलासह सानपाडा पुलावरही वाहतूककोंडीचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
सायन-पनवेल महामार्गावरील बहुतांशी पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. मागील दीड वर्षात या महामार्गावर जवळपास २५0 अपघात घडले असून, त्यात १00 पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासंदर्भात ठोस उपाययोजना आखण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

रेल्वेस्थानकाच्या भुयारात पाणी
सानपाडा रेल्वेस्थानकात देखील पाणी साचल्याने वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. प्रतिवर्षी या भुयारी मार्गात खड्डे पडून त्यात पाणी साचते. अशीच परिस्थिती ठाणे-बेलापूर मार्गावर महापे येथे नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गात देखील निर्माण होत आहे. तर कोपरखैरणे, घणसोली रेल्वेस्थानकाचे पादचारी भुयारी मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.

महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली
वाशी-कोपरखैरणे मार्गावर वाशी सेक्टर ९, तुर्भे, मॅफ्को मार्केट, सानपाडा यासह अनेक सखल भागातील मार्गावर एक ते दोन फुटापर्यंत पाणी साचले होते. रस्त्यालगतच्या नाल्यातून पाण्याचा निचरा न झाल्याने ते रस्त्यावरून वाहत होते. यामुळे बहुतांश ठिकाणी वाहतूक ठप्प होवून वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत होते. काही ठिकाणी सफाई कामगारांनी धाव घेवून तुंबलेली गटारे मोकळी करून पाण्याचा मार्ग मोकळा केला, तर दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सर्वच ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली.खांदा वसाहतीत स्थानिक नगरसेवकांनी यंदा नालेसफाईकरिता पाठपुरावा केला. त्यामुळे नाल्यातील गाळ काढून पावसाच्या पाण्याला मार्ग करून देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पाणी साचत होते तिथे गटारांची कामे करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी गेले दोन दिवस पाणी साचले नाही. सिडकोने चांगले काम केले असल्याची प्रतिक्रि या नगरसेवक संजय भोपी यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Sion-Panvel Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.