पंधराशे कोटी खर्चूनही सायन-पनवेल महामार्ग धोकादायक; देखभालीकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 12:05 AM2020-10-12T00:05:58+5:302020-10-12T00:06:09+5:30
भुयारी मार्गात पाच फूट पाणी
वैभव गायकर
पनवेल: सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शासनाने पंधराशे कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण केले आहे, परंतु चुकीची रचना व निकृष्ट कामांमुळे भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पाच फूट पाणी साचले असल्यामुळे त्यांचा वापर होत नसून, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.
वाहनांची सर्वाधिक वर्दळ असणाºया राज्यातील महत्त्वाच्या महामार्गामध्ये सायन-पनवेलचा समावेश आहे. महामार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असल्यामुळे शासनाने या महामार्गाचे रुंदीकरण केले. या कामासाठी जवळपास १,५०० कोटी खर्च करण्यात आले. वाशी, सानपाडा, जुईनगर, उरण फाटा, तळोजा लिंक रोड, कामोठे येथे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत, तर खारघर, कामोठे, तळोजा लिंक रोड, उरणफाटा, नेरुळ या ठिकाणी भुयारी मार्ग तयार केले आहेत, परंतु भुयारी मार्गांची रचना चुकली असून, ते खूपच अरुंद झाले आहेत. बांधकाम निकृष्ट झाले असून, सर्व भुयारी मार्गांत पाणीगळती सुरू आहे. खारघरमधील मार्गात पाच फूट पाणी साचले आहे. इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. भुयारी मार्गाचे दरवाजेही सडले आहेत.
ठेकेदाराकडून भुयारी मार्गाची देखभाल केली जात नाही. पाच वर्षांत एकदाही दुरुस्तीची कामे केली नाहीत. वास्तविक, शासनाने ठेकेदारावर कारवाई करणे आवश्यक आहे, परंतु कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. भुयारी मार्ग बंद असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने रस्ता ओलांडावा लागत आहे.
पालिकेचा खर्चही व्यर्थ
महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती ठेकेदार करत नसल्याने, नवी मुंबई महानगरपालिकेने नेरुळमधील भुयारी मार्गांची दुरुस्ती केली होती, परंतु तेथील मार्गांचीही दुरवस्था झाली असून, महानगरपालिकेचा खर्चही व्यर्थ गेला आहे.