सायन-पनवेल महामार्ग ठप्प
By admin | Published: June 26, 2017 01:41 AM2017-06-26T01:41:08+5:302017-06-26T01:41:08+5:30
अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या पावसाने रविवारी दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पडलेल्या पावसाने ठिकठिकाणचे रस्ते बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या पावसाने रविवारी दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पडलेल्या पावसाने ठिकठिकाणचे रस्ते बंद केले होते. तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याचे दिसून आले. सायं. पनवेल महामार्गही या वेळी ठप्प झाल्याचे दिसून आले. पनवेल तालुक्यात १०० मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याने देहरंग धरणाची पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याचे दिसून आले. सायन-पनवेल महामार्गावर मात्र वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. पाचपदरी महामार्गावरील सुमारे ३ पदरी रस्ता पाण्यात गेल्याने पुन्हा एकदा सायन-पनवेल महामार्गाच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. १५०० कोटी रु पये खर्चूनही या महामार्गावर पाण्याचा निचरा योग्यरीत्या होत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या महामार्गावर सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी टोल वसूल करते. मात्र, पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचण्याची नित्याचीच समस्या बनली आहे. आज खारघर, कळंबोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणाहून जात आहेत. मात्र, या ठिकाणी साचलेल्या पाण्याने काही प्रमाणात वाहतुकीचा वेग मंदावला होता. सततच्या पावसाने काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याचे पाहावयास मिळाले. कामोठे येथील नौपाडा गावात १५ ते २० घरांत पाणी शिरल्याने येथील गावकऱ्यांची धावपळ झाली. खारघरमधील फरशिपाडातील घरात पाणी साचले. पनवेल शहरातही काही सखल भागात पाणी साचल्याचे पाहवयास मिळाले.