‘फिफा’च्या तयारीसाठी उजळला सायन-पनवेल महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:07 AM2017-10-02T01:07:55+5:302017-10-02T01:08:31+5:30
सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद होते. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वाहनचालक, लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही महामार्ग अंधारातच होता.
पनवेल : सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद होते. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वाहनचालक, लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही महामार्ग अंधारातच होता. मात्र, ‘फिफा’ वर्ल्डकपमुळे महामार्गावरील पथदिवे दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्ग पुन्हा उजळला आहे. सुमारे तीन वर्षांपासून बंद असलेले पथदिवे सुरू झाल्याने चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यामुळे अपघातांची संख्याही कमी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
१९ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषकचे सामने नवी मुंबईतील डी. वाय. स्टेडिअममध्ये खेळविले जाणार आहेत. त्यासाठी जगभरातील प्रेक्षक नवी मुंबईत येणार असल्याने प्रशासनाने विकासकामांना गती दिली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली कामे प्रशासनाने हाती घेतली आहेत. डी. वाय. पाटील स्टेडिअमला लागूनच असलेल्या सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून, पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. याशिवाय दुभाजकांची रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
‘फिफा’चे सामने नवी मुंबईत आयोजित केले नसते, तर ही कामे अद्याप रखडलीच असती, त्यामुळे खारघरमधील मनसेचे युवानेते प्रसाद परब यांनी ‘फिफा’ सामन्यांच्या आयोजकांचे आभार मानले.