नवी मुंबई : वाशी ते बेलापूरपर्यंतचा सायन - पनवेल महामार्ग महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. हस्तांतर झाल्यानंतर १४ किलोमीटर लांबीच्या महामार्गावरील देखभाल दुरुस्तीचे काम पालिका करणार आहे.राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या सायन -पनवेल महामार्गाची योग्य देखभाल केली जात नाही. पावसाळ्यात सदर महामार्गावर मोठ्या प्रमाणात तक्रारी करत असतात. महामार्गामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून त्यामध्येही मनपाचा उल्लेख आहे. खड्डे, डेब्रिज व बंद असलेल्या पथदिव्यांमुळे अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय वारंवार वाहतूककोंडी होवून १४ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत आहे. फिफा सामन्यांदरम्यान महामार्गावरील अत्यावश्यक कामे पालिकेने केली आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून महामार्ग हस्तांतर करून घेण्याची मागणी होवू लागली होती.महामार्गाची योग्य देखभाल करता यावी व नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी महामार्ग हस्तांतर करून घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, तो पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
सायन - पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतर होणार, १४ किलोमीटरची देखभाल दुरुस्ती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 2:32 AM