सायन-पनवेल मार्ग पुन्हा खड्ड्यांत, कामाच्या दर्जावर संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:27 PM2019-09-16T23:27:02+5:302019-09-16T23:27:08+5:30
सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उरण फाटा, शिरवणे तसेच एल.पी. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने त्याठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावत आहे. यामुळे दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.
सायन-पनवेल मार्गावर सातत्याने जागोजागी खड्डे पडत आहेत. रस्त्याच्या काही ठिकाणचे काँक्रीटीकरण वगळता नव्याने बनवण्यात आलेल्या पुलांचाही त्यात समावेश आहे. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावरील पुलांची खड्ड्यांमुळे चाळण होत आहे. त्यात उरण फाटा येथील पूल, नेरुळचा एल.पी. पूल व शिरवणेतील पुलाचा समावेश आहे. या पुलांवरील खड्ड्यांमुळे त्याठिकाणी अनेक अपघात देखील झाले असून, त्यामध्ये कित्येकांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. यानंतर खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीची कामे केली जातात. मात्र त्यानंतर काही दिवसात पुन्हा सर्वत्र खड्डे पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे मागील दोन वर्षात सायन-पनवेल मार्गावर झालेल्या कामांच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर याचा फटका छोट्या-मोठ्या वाहनमालकांना बसत असून, प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई-पुण्याला जोडणारा सायन-पनवेल मार्ग महत्त्वपूर्ण असल्याने त्यावर शेकडो वाहनांची रहदारी सुरू असते. त्यात अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेल्या रुग्णवाहिकांचाही समावेश आहे. मात्र सातत्याने होणाºया वाहतूककोंडीत रुग्णवाहिका देखील अडकून पडत असल्याने, त्यामधील रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप होत आहे. तर याच वाहतूककोंडीमुळे एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाल्यास त्याची प्राणज्योत मावळण्याचीही भीती व्यक्त होत आहे. वाशी खाडीपुलावर देखील खड्डे पडले असून त्यामध्ये वाहने अडकून नुकसान होत आहे. सोमवारी सकाळी मुंबईकडे जाणाºया एका सिमेंट मिक्सर वाहनाचे एक्सेल या खड्ड्यात आपटून तुटले. त्यामुळे रहदारीसाठी एक लेन बंद झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. सुदैवाने चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवल्याने भीषण अपघात झाला नाही. परंतु सायन-पनवेल मार्गावर सातत्याने जागोजागी खड्डे पडत असतानाही, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासन हात आखडता घेत असल्याचा आरोप होत आहे.