साहेब काहीही करा, पण आयसीयूसह व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 01:32 AM2021-04-18T01:32:59+5:302021-04-18T01:33:13+5:30
वॉर रूममध्ये फोनचा वर्षाव : पालिकेची हेल्पलाइन ठरतेय नागरिकांना आधार
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रुग्णवाहिका व बेड उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या वॉर रूममधील हेल्पलाइन नंबरवर फोनचा वर्षावर होऊ लागला आहे. प्रतिदिन २५० ते ३०० नागरिक संपर्क साधत आहेत. साहेब काहीही करा, पण आयसीयूसह व्हेंटिलेटर्स उपलब्ध करा, अशी विनंती अनेक नागरिक करत आहेत. वॉर रूममधील डॉक्टर्स रुग्णांची माहिती घेऊन त्यांना लक्षणांप्रमाणे बेड उपलब्ध करून देत असून सर्वसामान्य नागरिकांसाठी मनपाची हेल्पलाइन आधार ठरत आहे.
पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ५ एप्रिलपासून हेल्पलाइन नंबर सुरू केला. मनपाच्या डॅशबोर्डवरही नंबर आहे. आतापर्यंत २,४४६ जणांनी बेडसाठी संपर्क केला. सुरुवातीला प्रतिदिन ६० ते ७० जण संपर्क करत होते. या आठवड्यात प्रतिदिन २५० ते ३०० नागरिक संपर्क करत आहेत. चोवीस तास ही सुविधा सुरू आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी फोन केल्यानंतर डॉक्टर्स लक्षणे समजून घेतात. लक्षणांप्रमाणे कोणता बेड द्यायचा याचा निर्णय घेतला जातो. बेड कुठे उपलब्ध आहे हे पाहून तो मिळवून देईपर्यंत पाठपुरावा करण्यात येत आहे.
प्रत्येक शिफ्टमध्ये ११ जणांची टीम
महानगरपालिकेच्या वॉर रूमचे कामकाज २४ तास सुरू ठेवण्यात येत आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये ३ डॉक्टर्स व ८ ऑपरेटर तैनात करण्यात येत आहेत. ऑपरेटर फोन घेऊन आवश्यकतेप्रमाणे तो डॉक्टरांकडे देतात. डॉक्टर रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांशी बोलून उपचाराची दिशा ठरवतात. तीन शिफ्टमध्ये वॉर रूममधील काम चालत आहे. बेड, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णांनी फोन केल्यानंतर प्रत्यक्ष बेड मिळवून देईपर्यंत फाॅलोऑफ वॉर रूमधून घेण्यात येत आहे.
कोणाला व्हेंटिलेटर्स हवे तर कोणाला रुग्णवाहिका
मनपाच्या हेल्पलाइनवर रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात संपर्क साधत आहेत. यामधील बहुतांश नागरिकांना आयसीयू बेड व व्हेंटिलेटर्स हवा आहे. साहेब लवकर बेड मिळवून द्या नाही तर रुग्णाचा जीव जाईल, अशी सादही घातली जात आहे. अनेकांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असते, तर काहींना रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असते. सर्वाधिक फोन आयसीयू व व्हेंटिलेटरसाठी येत आहेत. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून मनपाचे डॉक्टर्स आवश्यक ते बेड व रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आहेत.
अत्याधुनिक सुविधा
वॉर रूममधील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संगणक, प्रिंटर, वातानुकूलित दालन, कुलर, बोलण्यासाठी माईक व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांवर ताण येऊ नये यासाठी तीन शिफ्टमध्ये हे काम केले जात आहे.
रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध करून देण्यासाठी वॉर रूममध्ये स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. रुग्णांनी फोन केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून प्रत्यक्ष बेड मिळवून देण्यापर्यंत पाठपुरावा केला जात असून सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन २५० ते ३०० नागरिक या नंबरवर फोन करत आहेत.
- अभिजीत बांगर,
आयुक्त महानगरपालिका