नवी मुंबईकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:20 AM2018-06-02T03:20:33+5:302018-06-02T03:20:33+5:30

महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.

The situation of Navi Mumbai | नवी मुंबईकरांचे हाल

नवी मुंबईकरांचे हाल

Next

नवी मुंबई : महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या समस्येमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वीजपुरवठा तत्काळ सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
नवी मुंबईमधील तापमान ३६ अंशावर गेले आहे. तीव्र उकाड्यामुळे शहरवासी त्रस्त झाले असताना दोन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गुरुवारी ३१ मे रोजी घणसोली परिसरात सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी महावितरण कार्यालयात फोन करून माहिती घेण्यास सुरवात केली होती, परंतु व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. शहरातील इतरही काही
परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला होता.
बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कळवा येथील उपकेंद्रामध्ये अचानक स्फोट झाल्याने विजेच्या लपंडावामध्ये भर पडली आहे. या परिसरातील वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा महावितरणकडून प्रयत्न सुरू असून शहरात अनेक ठिकाणी भारनियमन सुरू केले आहे. महापारेषणला तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास अजून एक दिवस विलंब लागणार आहे. यामुळे विजेचा लपंडाव सुरू राहणार असल्याचे महावितरणच्यावतीने स्पष्ट केले आहे.
घणसोली परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणच्यावतीने नागरिकांना वेळेवर माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे अशीच स्थिती राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. वाशी, नेरूळ, सीवूड व सीबीडी बेलापूर परिसरामध्ये दुपारी वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईकरांवर भारनियमन लादले जावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शुक्रवारी ऐरोली ते सीबीडीपर्यंत वीजपुरवठा बंद असल्यामुळे अनेक नागरिकांनी शहरातील मॉल्सचा आश्रय घेतल्याचे चित्र पहावयास मिळत होते. विद्युतपुरवठा कधी सुरू होणार याची विचारणा करण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात शेकडो नागरिक फोन करुन विचारणा करत होते.

एमआयडीसीच्या कामावर परिणाम
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. शुक्रवारमुळे कारखाने बंद झाले असले तरी आयटी पार्क व इतर उद्योगांवर परिणाम झाला होता. शनिवारी वेळेत वीजपुरवठा सुरू झाला नाही तर अनेक कारखाने बंद ठेवावे लागणार असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

गरमीमुळे नागरिकांचे हाल
ऐरोली ते सीबीडीपर्यंत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वाढलेल्या तापमानामुळे घरात व कार्यालयांमध्ये थांबणेही अशक्य झाले होते. वीजपुरवठा लवकर पूर्ववत व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The situation of Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.