मधुकर ठाकूर -
उरण : राज्य सरकार सोमवारी नागपूर अधिवेशनामध्ये कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करणारे विधेयक मांडणार आहे. या सरकारच्या कामगार विरोधी धोरणांना सीआयटीयू कामगार संघटना राज्यभर विरोध करणार असल्याची घोषणा सिटूचे महाराष्ट्र सचिव ॲड.एम.एच.शेख यांनी उरण येथील जिल्हा अधिवेशनात केली. उरण येथील जेएनपीटी कामगार वसाहतीच्या सभागृहात आयोजित सीआयटीयुच्या रायगड जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते.
नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. या बदलात कामगार कायद्यात मालक आणि भांडवलदारांसाठी असलेली शिक्षा आणि दंड कमी करून दिखाऊ तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे कामगार कायदे कमजोर होणार आहेत. यात यापूर्वी असलेल्या कायद्यातील किमान शिक्षा आणि दंड कमी करून मालक आणि भांडवलदाराना रान मोकळं केलं जाणार आहे.
याचा परिणाम कामगारांचे भांडवलदार व मालकांच्या शोषणात होणार आहे. त्यामुळे या कायदा बदलांचा संपूर्ण राज्यात सीआयटीयुच्या वतीने विरोध करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यात निदर्शने आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवेदने देऊन विरोध करण्यात येणार येणार असल्याची घोषणा सिटूचे महाराष्ट्र सचिव ॲड.एम.एच.शेख यांनी जिल्हा अधिवेशनात केली.
कामगार नेते मधुसूदन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या रायगड जिल्हा अधिवेशनात सीआयटीयुचे रायगड जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील यांनी तीन वर्षांच्या कामाचा अहवाल मांडला. तर कामगार प्रतिनिधीनी चर्चा करून पुढील काळात कामगारांच्या प्रश्नांवर लढा व एकजूट करण्याचा निर्धारही करण्यात आला. या अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी नवीन रायगड जिल्हा कमिटीचीही निवड करण्यात आली.याप्रसंगी महाराष्ट्राचे नेते कामगार नेते डॉ.एस.के.रेगे, के.आर.रघु, किसान सभेचे संजय ठाकूर,जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अमिता ठाकूर,डीवायएफआयचे सचिव राकेश म्हात्रे,शशी यादव,कल्पना घरत,विद्या पाटील, हिरामण पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते.