केमिकल विक्रीप्रकरणी सहा जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई : २४ लाखांचे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:21 AM2017-09-08T03:21:50+5:302017-09-08T03:21:51+5:30
रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये अवैधपणे केमिकल विक्री करणा-या टोळीतील सहा जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख रूपये किमतीचे साहित्य हस्तगत केले आहे.
नवी मुंबई : रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये अवैधपणे केमिकल विक्री करणा-या टोळीतील सहा जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख रूपये किमतीचे साहित्य हस्तगत केले आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये अवधेश कृपाशंकर यादव, राजीव देवेंद्र राजभर, आकाश विजय गुप्ता, धनंजय ऊर्फ छोटू सहदेव मेहता, समीर ऊर्फ संदीप रामाशंकर सिंग व महेश नंदलाल कुमार या सहा जणांचा समावेश आहे. रबाळे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये एकवीरा हॉटेलजवळ अवधेश यादव व त्याचे सहकारी टँकरमधून केमिकलची चोरी करून त्याची विक्री करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाºयांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार पिंजण, सहायक पोलीस निरीक्षक प्रतापराव कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत व त्यांच्या पथकाने ४ सप्टेंबरला धाड टाकली. पहाटे पावणे तीन ते साडेतीन दरम्यान ही कारवाई करण्यात आली. रोडच्या बाजूला असलेल्या टँकर क्रमांक एमएच ०४ एफ जे ७८४० मधून चार व्यक्ती पाइप टाकून केमिकल काढत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले. केमिकलने भरलेले चार व रिकामे चार ड्रम ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता अवधेश कुमार यादव हा चोरीचे केमिकल विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे समजले. उर्वरित पाच जण टँकरमधून केमिकल काढून ते संबंधितांना पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांकडून तब्बल २४ लाख रूपयांचे केमिकल व इतर साहित्य जप्त केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याची चौकशी करण्यात
येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.