सहा समित्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडे, दोन प्रभागात शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 02:07 AM2019-05-11T02:07:16+5:302019-05-11T02:07:49+5:30
महापालिकेच्या आठ प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या वेळी एच प्रभागच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून अध्यक्षाची निवड करण्यात आली.
नवी मुंबई : महापालिकेच्या आठ प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या वेळी एच प्रभागच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून अध्यक्षाची निवड करण्यात आली. कोकण विभागाचे अप्पर आयुक्त राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली.
सीबीडी येथील महापालिका मुख्यालयात प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवडणूक झाली. त्यास कोकण विभागाचे अप्पर आयुक्त राजेंद्र क्षीरसागर हे पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते. या वेळी झालेल्या निवडणुकीत ‘अ’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी स्वप्ना गावडे, ‘ब’ प्रभाग समितीवर श्रद्धा गवस, ‘क’ प्रभाग समितीवर अंजली वाळुंज, ‘ड’ प्रभाग समितीवर उषा भोईर, ‘ई’ प्रभाग समितीवर लीलाधर नाईक, ‘फ’ प्रभाग समितीवर रंजना सोनवणे तर ‘जी’ प्रभाग समितीवर आकाश मढवी यांची बिनविरोध निवड झाली. या दरम्यान ‘एच’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी दीपा गवते व जगदीश गवते यांनी अर्ज भरले होते. त्यांना प्रत्येकी तीन मते मिळाल्याने दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यामधून एक चिठ्ठी विद्यार्थ्याद्वारे उचलण्यात आली. त्यामध्ये जगदीश गवते यांची ‘एच’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवड जाहीर करण्यात आली, त्यानुसार सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचे पीठासन अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अभिनंदन केले.