बारावी परीक्षेसाठी सहा भरारी पथकांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:23 AM2018-02-20T06:23:54+5:302018-02-20T06:23:57+5:30
बारावी बोर्डाची परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबई विभागीय मंडळ सज्ज झाले आहे
प्राची सोनवणे
नवी मुंबई : बारावी बोर्डाची परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबई विभागीय मंडळ सज्ज झाले आहे. मुंबई केंद्रावरील परीक्षा सुरक्षितरीत्या पार पडावी, तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता पहिल्यांदाच बोर्डाच्या वतीने सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दक्षता समितीसह जिल्हानिहाय प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी तसेच महसूल विभाग यांचे स्वतंत्र पथक असणार आहे. गेल्या वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअॅपवर फिरणाºया प्रश्नपत्रिके मुळे यंदा विशेष खबरदारी घेत वर्गातच १० वाजून ५० मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे.
बुधवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी सुट्टीच्या दिवशी देखील बोर्डाचे कामकाज सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाºयांनी दिली. सोमवारी पोलीस संरक्षणासह १४ गाड्यांमधून ठाणे, पालघर, रायगड केंद्रावर परीक्षेचे गोपनीय साहित्य पोहोचविण्यात आले तर मंगळवारी उर्वरित १३ गाड्यांमधून मुंबई विभागातील सर्व केंद्रावर साहित्य सुरक्षितरीत्या पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाने दिली. यावेळी केंद्र संचालक तसेच परीरक्षकांना परीक्षा नियमांचे पालन, घ्यावयाची काळजी याविषयी सूचना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइलचा वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील. केंद्रापासून १०० मीटर अंतरावरील झेरॉक्स, टेलिफोन बुथ बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करणार असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या कमी आहे आणि परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.