उरण : पावसाळी मासेमारीबंदीच्या आदेशानंतरही खोल समुद्रात मासेमारी करणा-या करंजा-उरण येथील सहा मच्छीमार बोटी शनिवारी (२०) कारवाई करीत ताब्यात घेतल्या असल्याची माहिती, उरण सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी स्वप्निल दाभणे यांनी दिली. उरण तालुक्यातील करंजा व करंजा टर्मिनल्स या परिसरात शासनाच्या पावसाळी मासेमारीबंदीच्या आदेशानंतरही खोल समुद्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करीत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे रायगड जिल्हा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी स्वप्निल दाभणेयांनी आपल्या पथकासह धाड टाकली.या धाडीत करंजा येथील देवी कुलस्वामिनी, जय मल्हार साईराज, श्री समर्थ कृपा, आई माउली, जय शिवसाई सागर, सद्गुरू कृपा आदी सहा मच्छीमारी बोटी बेकायदेशीररीत्या मासेमारी करीत असल्याच्या आढळून आल्या. या मासेमारी बोटींवर कारवाई करीत, त्या बोटी ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.सोमवारी (२१) त्यांच्या विरोधात उरण तहसीलदारांकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
अवैध मासेमारी करणाऱ्या सहा बोटी जप्त, पावसाळी मासेमारीवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:43 PM