नवी मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करांचा बुरखा फाडणाऱ्या गुन्हेगारी वेबसिरीजला लाजवेल, अशा थाटात नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी संपूर्ण नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात संभाव्य धोके ओळखून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहाशेवर कर्मचारी, सायबर तज्ज्ञ, फायबर ब्रिगेडला सोबत घेऊन ७५ नायजेरियन नागरिकांच्या सहा ठिकाणांवर एकाच वेळी धाडी टाकून अमली पदार्थ विक्रेते, त्यांचे हस्तक यांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले.
भला मोठा फौजफाटा आणि मोहीम फत्ते झाली
संपूर्ण मोहिमेविषयी नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे लोकमतशी बोलताना म्हणाले, नवी मुंबई शहर आणि परिसरात काही आफ्रिकन देशांतील नागरिक अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे, व्हिसाची मुदत संपलेली असतानाही राहत असल्याची माहिती मिळाली होती. केंद्राकडूनही सूचना होत्या. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन व्यूहरचना केली. नायजेरियन कोणकोणत्या भागात राहतात, काय करतात, किती जणांच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे, अमली पदार्थांची तस्करी करणारे असतील तर पोलिस कारवाई करतेवेळी ते काय-काय करू शकतात, आतापर्यंतच्या अनुभवावरून मागील कारवाईवेळी त्यांनी काय कृत्ये केली, याचा पूर्ण अभ्यास केला. पूर्ण तयारीनिशी कोणीही सुटू नये, अनुचित प्रकार होऊ नये याचे नियोजन करून योजना आखली गेली. शुक्रवारी एकाच वेळी सहआयुक्त संजय मोहिते, अपर आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त अमित काळे, विवेक पानसरे, पंकज डहाणे यांनी विविध ठिकाणी छापे मारले.
धाडीत रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड का?
पोलिसांच्या कोणत्याही धाडीत आतापर्यंत रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडची वाहने कधीही नव्हती. यावेळी मात्र ही वाहने धाडीत होती. या आधी नायजेरियनने धारदार शस्त्राने कापून स्वत:ला जखमी करून घेतले किंवा पळून जाण्यासाठी इमारतीवरून उड्या घेतल्या होत्या. यात काही ठिकाणी ते जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे या धाडींमध्ये तसे करून स्वत:ला जखमी करून घेतले तर मोहीम सोडून जाण्याची वेळ येऊ नये म्हणून रुग्णवाहिका, वैद्यकीय कर्मचारी सोबत घेतले गेले. काही प्रकारात तस्कर अमली पदार्थांना आग लावून ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तसे केल्यास आग पसरून मोठी हानी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून फायर ब्रिगेड वाहने सोबत घेतली गेली.
महिला पोलिसांसोबत कपडेही
धाडी टाकताना आधी साध्या वेशातील महिला कर्मचाऱ्यांना दारावरची बेल, कडी वाजविण्यास सांगितले. सोबत पोलिस कर्मचारी होतेच. कधी-कधी तस्करांसोबतच्या महिला अंगावरील कपडे फाडून विवस्त्र होऊन पोलिसांवर वाट्टेल ते आरोप करू शकतात. यामुळे असा प्रकार कुणी केला तर असावेत म्हणून महिला पोलिसांनी सोबत नेलेले कपडे आरोपी महिलेला पकडून घालायचे, असा प्लॅन होता.
पासपोर्ट अधिकारी होते सोबतनायजेरियन विरोधातील कारवाई करताना नवी मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच पासपोर्ट अधिकाऱ्यांनाही सोबत घेतले होते. ज्या नायजेरियन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली त्यांच्याकडील पासपोर्टची मुदत आहे की संपलेली आहे, तो कोणत्या देशाचा आहे, बनावट आहे की खरा याची लागलीच खातरजमा करण्यात येत होती. यात गुन्हा दाखल करताना संबंधित कलम लावावे की नाही, यासाठी त्याची मदत होत होती.