माकडाच्या हल्ल्यात शिरढोण येथे सहा विद्यार्थी जखमी; जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात केले उपचार
By नारायण जाधव | Published: February 21, 2024 07:01 PM2024-02-21T19:01:54+5:302024-02-21T19:02:32+5:30
या वनपट्ट्यात वन्य प्राण्यांसह माकडांची संख्या मोठी आहे.
नवी मुंबई: पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात माकडांचा उपद्रव वाढला असून, शिरढोण गावातील मनोदय इंग्लिश मीडियम स्कूलमधील पाच ते सहा विद्यार्थ्यांवर माकडाने हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबिजचे इंजेक्शन देऊन प्रथमोपचार करण्यात आले. पनवेलच्या ग्रामीण भागात कर्नाळा अभयारण्यासह नेरे, माथेरान रस्ता या भागात जंगल आहे.
या वनपट्ट्यात वन्य प्राण्यांसह माकडांची संख्या मोठी आहे. मात्र, महामार्ग, रेल्वे, कॉरिडोरसह पनवेल बांधकाम विकासकांचे मोठेमोठे प्रकल्प याच भागातून जात आहेत. यामुळे वन्य प्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. यातूनच त्रासलेल्या काही माकडांपैकी एकाने शिरढोण गावातील मनोदय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला. यात त्यांना जखमा झाल्याने शाळेसह स्थानिकांनी तत्काळ या जखमी विद्यार्थ्यांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून त्यांना रेबिजचे इंजेक्शन देऊन प्रथमोपचार केले.