नवी मुंबई : कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी विविध मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यानंतरसुद्धा अनेक मार्गावर प्रवाशांची गर्दी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनल ते थिविमदरम्यान विशेष गाड्यांच्या आणखी १२ फेऱ्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. या गाड्या आठवड्यातून तीन दिवस चालविल्या जाणार आहेत.यात मुंबईहून पहिली गाडी २६ एप्रिल रोजी तर थिविम स्थानकातून २७ एप्रिलला धावणार आहे. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या असणार आहेत.
उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वेने यापूर्वी साप्ताहिक तसेच द्विसाप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. विविध मार्गांवर धावणाऱ्या या विशेष गाड्यांचा प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी काही मार्गावर प्रतीक्षा यादी वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनल ते थिविम दरम्यान २६ एप्रिल ते ५ मे यादरम्यान विशेष गाडीच्या १२ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल - थिविम (०१०१७) ही गाडी प्रत्येक शुक्रवार, रविवार आणि मंगळवार अशी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
त्याचप्रमाणे थिविम - लोकमान्य टिळक टर्मिनल (०१०१८) ही विशेष गाडी प्रत्येक शनिवार, सोमवार आणि बुधवार अशी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ही गाडी सायंकाळी ४:३५ वाजता थिविम स्थानकातून सुटेल तर दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता ती लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.