स्वच्छतेचा संदेश देत धावले सहा हजार नवी मुंबईकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:08 AM2020-01-06T00:08:09+5:302020-01-06T00:08:16+5:30
स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई : स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे सहा हजार जणांनी सहभाग घेतला होता. या वेळी खुल्या गटात २१ कि.मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये पुरुष गटातून विष्णू राठोरे व महिला गटातून साईगीता नायर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
नागरिकांना शहर स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याच संकल्पनेतून महापालिका व स्टर्लिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाम बीच मार्गावर नवी मुंबई महापौर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत ही मॅरेथॉन झाली. त्यामध्ये ज्येष्ठांसह सुमारे सहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्यात २१ कि.मी. खुला गट (१८ ते ३५ वयोगट), २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन, १० कि.मी., पाच किमी, तीन कि.मी. व दोन कि.मी. अंतराच्या गटात ही मॅरेथॉन घेण्यात आली. आमदार गणेश नाईक, सभागृहनेते रवींद्र इथापे, सभापती डॉ. जयाजी नाथ, नेत्रा शिर्के, स्टर्लिंग इन्स्टिट्यूटच्या सचिव पूर्वा वळसे-पाटील, विश्वस्त अशोक पाटील, शहर अभियंता सुरेंद्र पाटील आदी उपस्थित यावेळी होते. याप्रसंगी आमदार नाईक यांनी उत्तम नागरी सुविधांप्रमाणे शिक्षण, आरोग्य व क्रीडा विषयक उपक्रमातून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात असल्याचे समाधान व्यक्त केले.
>दिव्यांग जयश्री शिंदेचा विशेष सत्कार
खुल्या गटात पुरुषांमधून विष्णू राठोरे व महिलांमधून साईगीता नायर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विष्णू यांनी २१ कि.मी.चे अंतर एक तास १० मिनिटे ५२ सेकंदात पार केले. तर साईगीताने १ तास ३४ मिनिटे ३५ सेकंदात अंतर पार केले. मॅरेथॉनमध्ये पायाने अधू असूनही दहा कि.मीची मॅरेथॉन जिद्दीने पार करणाऱ्या जयश्री शिंदे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. त्याशिवाय प्रत्येक गटाच्या स्पर्धेच्या विजेत्यांनाही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.