नवी मुंबई : महापालिकेच्या दिघा विभाग कार्यालयामार्फत परिसरातील सहा विनापरवाना मोबाइल टॉवर हटवण्यात आले आहेत. रहिवासी ठिकाणी, तसेच कंपन्यांच्या आवारात हे टॉवर उभारण्यात आले होते. परंतु नोटीस बजावूनही कंपनीकडून परवानगीची पूर्तता न झाल्याने ते टॉवर हटवून साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहरात विनापरवाना मोबाइल टॉवर उभारणीचे प्रमाण वाढत आहेत. जागा मालकाला हाताशी धरून मोबाइल नेटवर्क कंपन्यांकडून हे टॉवर उभारले जात आहेत. परंतु हे टॉवर उभारणीसाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. असाच प्रकार दिघा विभाग कार्यालय क्षेत्रात सुरू होता. मुकुंद कंपनीलगतच्या परिसरात व इतर काही ठिकाणी सहा मोबाइल नेटवर्क टॉवर विनापरवाना उभारण्यात आले होते. यानुसार पालिकेतर्फे संबंधित नेटवर्क कंपन्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती. परंतु उभारलेल्या टॉवरकरिता पालिकेची परवानगी घेण्याची सूचना करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली त्या सहा मोबाइल नेटवर्क टॉवरवर कारवाई करण्यात आली आहे. हे टॉवर हटवून त्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सहा विनापरवाना मोबाइल टॉवर हटवले
By admin | Published: February 21, 2017 6:26 AM