सहा वाहनांची एकमेकांना धडक , सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:48 PM2018-03-22T23:48:45+5:302018-03-22T23:48:45+5:30
सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री विचित्र अपघात घडला. मुंबईहून पनवेलकडे जाणारी सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री विचित्र अपघात घडला. मुंबईहून पनवेलकडे जाणारी सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाशीतील एमजीएम आणि नेरूळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ चालकाचे नाव हर्षद पाटील (३४) असे असून तो उरणमधील नवीन शेवा येथे राहणारा आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हर्षद मुंबईहून स्कॉर्पिओ घेऊन उरण येथे जात होता. सायन-पनवेल मार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्षदचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे जाणाऱ्या वॅगनरला त्याच्या स्कॉर्पिओची जोरदार धडक बसली. या जोरदार धडकेत वॅगनार कार थेट महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर गेली, तर धडक देणारी स्कॉर्पिओ जागेवरच बंद पडली. स्कॉर्पिओ अचानक बंद पडल्याने मागून येणारी स्कोडा, गॅस टँकर, डंपर आणि आयटेन गाडीची एकमेकांना धडक बसली. या अपघातात डंपर चालकासह स्कोडा आणि आयटेन कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत्त समजताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमी पल्लवी नायर, दीपक चव्हाण आणि मोहम्मद शाबीर शेख या तिघांना नेरु ळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तर आयटेनमधील अनुरागकुमार सक्सेना (५८), रेखा सक्सेना (५६) आणि डंपर चालक मेहजबीन नुर मोहम्मद शेख या तिघांना वाशीतील एमजीएम रु ग्णालयात दाखल केले. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या स्कॉर्पिओ चालकाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
महामार्गावर वाहतूककोंडी
या अपघातात वॅगनार, स्कॉर्पिओ, स्कोडा, आयटेन या कारसह गॅसचा टँकर आणि डंपर या वाहनांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. टँकर आणि डंपरच्या मध्ये स्कोडा अडकल्याने तिचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. या अपघातामुळे मध्यरात्रीच्या सुमारास वाशी उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दोन्ही मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करीत अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्याने सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत झाली.