सहा वर्षांतील पॉक्सोच्या गुन्ह्यांचा पुन्हा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:07 AM2018-09-29T05:07:58+5:302018-09-29T05:08:03+5:30
पॉक्सोच्या पंधरा गुन्ह्यांत अटक केलेल्या रेहान कुरेशी याने लग्न होत नसल्याने अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्याच्या प्रवृत्तीला सुरुवातीच्या काळातच लगाम बसला असता; परंतु पोलिसांच्या आरोपीच्या वयाविषयी चुकीच्या नोंदीमुळे त्याची अटक टळली होती.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - पॉक्सोच्या पंधरा गुन्ह्यांत अटक केलेल्या रेहान कुरेशी याने लग्न होत नसल्याने अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्याच्या प्रवृत्तीला सुरुवातीच्या काळातच लगाम बसला असता; परंतु पोलिसांच्या आरोपीच्या वयाविषयी चुकीच्या नोंदीमुळे त्याची अटक टळली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनीच आरोपीला अटक केली असून पोलिसांनी आता पाच ते सहा वर्षांतील पॉक्सोच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे.
मागील दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रेहान अब्दुल राशिद कुरेशी (३४) याला गुन्हे शाखा पोलिसांनी मीरा रोड येथून बुधवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने पॉक्सोच्या पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करूनही त्याचे लग्न होत नव्हते. मोठ्या भावाने रेहान व भाजून जखमी झाल्याने घरीच असलेल्या एका भावाचे एकत्र लग्न लावून देण्याचाही प्रयत्न केलेला; परंतु अनेक कारणांनी रेहानचे लग्न जुळत नसल्याने दोघेही अविवाहित आहेत. यामुळेच वासनेतून लहान मुलींना लक्ष्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, जे गुन्हे नोंदीवर आहेत, त्याचीच पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली आहे. परंतु बदनामीच्या भीतीमुळे काही पालकांनी रेहानने केलेल्या अत्याचाराविरोधात तक्रार करण्याचे टाळणारेही काही पालक पोलिसांसमोर आले आहेत. यामुळे रेहानच्या गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी मागील पाच ते सहा वर्षांत उघड न झालेल्या पॉक्सोच्या गुन्ह्यांचा नव्याने तपास होणार आहे.
दरम्यान, रेहान हा यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागला असता. परंतु तळोजा पोलिसांच्या जुन्या नोंदीवरील चुकीचे वय व पूर्वकल्पना देऊनही पालघर पोलिसांचा झालेला गाफीलपणा यामुळे त्याला पुढील गुन्ह्याची संधी मिळत गेली. २३ जानेवारी २०१५ मध्ये रेहानवर तळोजा पोलीसठाण्यात आठ वर्षांच्या मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा पहिला गुन्हा दाखल असून त्यात अटक देखील झालेली. परंतु गुन्हा नोंदवताना तत्कालीन अधिकाºयांच्या दुर्लक्षाने कागदोपत्री त्याचे वय चुकीने ३० ऐवजी ३४ लागले. यामुळे पॉक्सोच्या गुन्ह्यांची मालिका सुरू असताना, सीसीटीव्हीतील संशयिताला पकडण्यासाठी नेमका तोच गुन्हा सोडून पोलिसांनी २५ ते ३० वयोगटातील पॉक्सोच्या इतर सर्व आरोपींची माहिती तपासली, अन्यथा वर्षभरापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले असते.
तर १३ सप्टेंबरला तुळींज पोलीसठाण्यात घडलेल्या गुन्ह्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना घटनेचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर पुन्हा २० तारखेला श्रीरामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने दुसरा गुन्हा केला. पालघर पोलिसांना गुन्ह्याचे गांभीर्य नसल्याने २१ तारखेला त्याच परिसरात त्याने तिसरा गुन्हा केला.
दहा दिवसांची कोठडी
रेहानला अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला ६ आॅक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान चौकशीत त्याच्याकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे
रेहान कुरेशी याने पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली असली, तरीही त्याने इतरही अनेक गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे अद्याप लग्न झालेले नसून शारीरिक भूक भागवण्यासाठी त्याने अल्पवयीन मुलींना लक्ष्य केल्याचेही कबूल केले आहे. त्याने केलेल्या इतरही गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी उघड न झालेल्या पॉक्सोच्या गुन्ह्यांचा पुन्हा तपास केला जाणार आहे.
- तुषार दोशी,
गुन्हे शाखा उपआयुक्त
आॅपरेशन मन‘मोहन’ यशस्वी
सीसीटीव्हीत दिसणाºया चालीवरून गुन्हे शाखा पोलिसांनी या मिशनला आॅपरेशन मन‘मोहन’ नाव दिले होते. त्यामध्ये १०० हून अधिक पोलिसांना तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. शिवाय दोन पथकांवर मीरा रोडची जबाबदारी सोपवण्यात आलेली. त्यामध्ये गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे, सहायक निरीक्षक उल्हास कदम व राहुल राख, तर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार, उपनिरीक्षक योगेश वाघमारे, विजय चव्हाण यांचा समावेश होता. त्यानुसार झोपेत सुद्धा रेहानची चाल ओळखतील एवढा त्याच्याविषयी अभ्यास केल्याने उपनिरीक्षक वाघमारे यांनी मीरा रोड स्थानकालगतच्या गर्दीतून अवघ्या चालीवरून त्याला शोधून काढले.