कौशल्य विकास केंद्र लवकरच
By Admin | Published: July 17, 2015 02:47 AM2015-07-17T02:47:58+5:302015-07-17T02:47:58+5:30
शहरातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी देणारे कौशल्य केंद्र उभारण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी नरिमन पॉइंटच्या निर्मल भवन येथे झालेल्या बैठकीत केली.
नवी मुंबई : शहरातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी देणारे कौशल्य केंद्र उभारण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी नरिमन पॉइंटच्या निर्मल भवन येथे झालेल्या बैठकीत केली. या बैठकीत सिडकोचे संचालक संजय भाटिया आणि कौशल्य विकास(स्किल डेव्हलपमेंट) योजनेचे सचिव विजय गौतम यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून लवकरच नवी मुंबईत कौशल्य विकास केंद्र उभारण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयास हिरवा कंदील मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेला सुरुवात करण्यात येणार आहे.
कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून लाखो भारतीय युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रमोद महाजन कौशल्य योजना सुरू केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबईसारख्या सायबर सिटीत स्थापन करण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्रासाठी संजय भाटिया यांनी ५ एकरचा भूखंड देण्याचे कबूल केले. तर विजय गौतम यांनी नवी मुंबई परिसरातील वेगवेगळ््या कंपन्यांना सहभागी करून त्यांच्यामार्फत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यामाध्यमातून नवी मुंबई शहरातील हजारो युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले.