माळशेज घाटात दरड कोसळणे सुरूच
By admin | Published: July 11, 2016 02:01 AM2016-07-11T02:01:11+5:302016-07-11T02:01:11+5:30
माळशेज घाटात दरडी कोसळण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे पर्यटक आणि वाहतूकदारांची अडचण होऊ नये, यासाठी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत
मुरबाड : माळशेज घाटात दरडी कोसळण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे पर्यटक आणि वाहतूकदारांची अडचण होऊ नये, यासाठी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. घाट बंद असल्याने येथील वाहतूक मुरबाड-कर्जतमार्गे वळवण्यात आली आहे.
धोकादायक वळवणे व दरडी कोसळून वेळोवेळी अपघात होऊन वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. तो होऊ नये म्हणून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च होतो. तरीही, दरडी कोसळण्याची मालिका सुरूच असल्याने पर्यटक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असते.
माळशेज घाटात कोसळलेल्या दरडीमुळे निसर्गप्रेमींनी आपला दौरा सिद्धगडकडे वळवला. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. तहसीलदार म्हस्के-पाटील यांनी रस्त्यात अडकलेल्या प्रवाशांना नगरपर्यंत पोहोचता यावे, म्हणून मुरबाड-कर्जतमार्गे वाहतूक वळवली आहे. या उपायाचा बऱ्यापैकी उपयोग होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)