शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल; शासनाच्या पथकाने केली पाहणी

By नारायण जाधव | Published: May 31, 2024 06:32 PM2024-05-31T18:32:14+5:302024-05-31T18:32:43+5:30

एनआरआय वसाहत आणि अमय सोसायटीच्या मागील बाजूस खारफुटीची कत्तल चालविली असल्याची पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांची तक्रार होती.

Slaughter of mangroves in the name of agriculture; Government team inspected | शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल; शासनाच्या पथकाने केली पाहणी

शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल; शासनाच्या पथकाने केली पाहणी

नवी मुंबई : नवी मुंबईच्या पाम बीच रोडलगतच्या परिसरात खारफुटीची कत्तल थांबता थांबत नसून, भूमाफियांनी आता शेतीच्या नावाखाली खारफुटीच्या झाडांची कत्तल चालविली असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी मँग्रोव्ह सुरक्षा ॲपवर केल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन शुक्रवारी महसूल आणि मँग्रोव्ह सेलच्या पथकाने या परिसराची पाहणी केली. या पथकात बेलापूरचे तलाठी ईश्वर जाधव आणि मँग्रोव्हज सेलचे संदीप रोकडे यांचा समावेश होता.

एनआरआय वसाहत आणि अमय सोसायटीच्या मागील बाजूस खारफुटीची कत्तल चालविली असल्याची पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांची तक्रार होती. सध्या नवी मुंबईतील पाम बीच रोडलगतच्या जमिनींना सोन्याचे मोल आल्याने भूमाफिया आणि काही विकासकांची वक्रदृष्टी पडली आहे. यामुळे या भागात कोणी नर्सरी थाटत आहे, तर कोणी झोपड्या बांधत असून काहीजण शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल करीत आहेत. याबाबत अगरवाल यांनी सातत्याने विविध स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

नवी मुंबई महापालिकेने फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास असलेला डीपीएस तलाव आणि एनआरआय पाणथळींवर निवासी आणि वाणिज्यिक वापर दर्शविला आहे. याविरोधात शहरवासीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाही जागा बळकावण्यासाठी भूमाफियांकडून खारफुटीची कत्तल सुरूच आहे. यंदा होणारी खारफुटीची कत्तल ही दरवर्षीपेक्षा अधिक असून, याकडे शासकीय यंत्रणांनी पूर्णत: दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करून अगरवाल यांनी मँग्रोव्ह सुरक्षा ॲपवर तक्रार केली होती. त्यावर महसूल-वने आणि पर्यावरण विभागाने आम्ही लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी बेलापूरचे तलाठी ईश्वर जाधव आणि मँग्रोव्हज सेलचे संदीप रोकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आपला अहवाल ते लवकरच सादर करणार आहेत.

Web Title: Slaughter of mangroves in the name of agriculture; Government team inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.