शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल, पाम बीच रोड परिसरातील प्रकार; मँग्रोज सुरक्षा ॲपवर तक्रार
By नारायण जाधव | Updated: May 27, 2024 17:00 IST2024-05-27T16:59:40+5:302024-05-27T17:00:58+5:30
एनआरआय वसाहत आणि अमय सोसायटीच्या मागील बाजूस खारफुटीची ही कत्तल चालविली असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी केली आहे.

शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल, पाम बीच रोड परिसरातील प्रकार; मँग्रोज सुरक्षा ॲपवर तक्रार
नवी मुंबई :नवी मुंबईच्या पाम बीच रोड लगतच्या परिसरात खारफुटीची कत्तल थांबता थांबत नसून, भूमाफियांनी आता शेतीच्या नावाखाली खारफुटीच्या झाडांची कत्तल चालविली असल्याची नवी तक्रार मँग्रोज सुरक्षा ॲपवर करण्यात आली आहे. एनआरआय वसाहत आणि अमय सोसायटीच्या मागील बाजूस खारफुटीची ही कत्तल चालविली असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी केली आहे.
सध्या नवी मुंबईतील पाम बीच रोडलगतच्या जागांना सोन्याचे मोल आल्याने भूमाफिया आणि काही विकासकांची वक्रदृष्टी पडली आहे. त्यांच्याच दबावाखाली नवी मुंबई महापालिकेेने फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास असलेला डीपीएस तलाव आणि एनआरआय पाणथळींवर निवासी आणि वाणिज्यिक वापर दर्शविला आहे. याविरोधात शहरवासीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच हा नवा प्रकार समोर आला असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. यंदा शेतीच्या नावाखाली होणारी खारफुटीची कत्तल ही दरवर्षीपेक्षा अधिक असून, याकडे शासकीय यंत्रणानी पूर्णत: दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी मँग्रोज सुरक्षा ॲपवर केलेल्या तक्रारीवर वने आणि पर्यावरण विभागाने आम्ही लवकरच कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.