MIDC मधील रस्ता रूंदीकरणादरम्यान वाचविलेल्या वृक्षांची कत्तल
By नामदेव मोरे | Published: March 10, 2024 02:52 PM2024-03-10T14:52:34+5:302024-03-10T14:53:15+5:30
नेरूळ एलपी जवळील प्रकार : चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी
नामदेव मोरे
नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमध्ये नेरूळ एलपी येथे रस्ता रूंदीकरण करताना वाचविलेल्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.पदपथाला लागून असलेले वृक्ष तोडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. करावे येथे पाणथळ तलावाचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. दुसरीकडे एमआयडीसीमध्येही बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. नेरूळ एलपी पुलाच्या समोर महानगरपालिकेने पदपथाला लागून वृक्षलागवड केली होती. अनेक वृक्ष २० ते २५ फुट उंच वाढले होते. महामार्गाला लागून असलेल्या जोड रस्त्याच्या रूंदीकरणाच्या दरम्यानही या वृक्षांचे अस्तीत्व कायम राहील याकडे लक्ष दिले होते. तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी रूंदीकरणादरम्यान येथील वृक्षतुटणार नाहीत याकडे लक्ष दिले होते. परंतु काही दिवसांपुर्वी अचानक येथील वृक्ष तोडण्यात आले आहेत. या ठिकाणी सुरू होत असलेल्या नवीन कंपनीच्या बांधकामाचा दर्शनी भाग दिसावा यासाठी वृक्षतोड केली जात असल्याची शंका स्थानीक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
या वृक्षतोडीविषयी माजी परिवहन समिती सभापती चंद्रकांत आगोंडे यांनीही आक्षेप घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त, एमआयडीसी प्रशासनाकडे याविषयी लेखी तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे. पदपथाला लागून असलेले वृक्ष कोणत्याही स्थितीमध्ये तोडण्यात येवू नये अशी भुमीका त्यांनी घेतली आहे. वृक्ष तोड करण्यासाठी परवानगी दिलीच कशी. वृक्ष तोड करण्यापुर्वी स्थानीक नागरिकांकडून सुचना व हरकती मागविणे आवश्यक होते. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांवर सुचना लावणे आवश्यक होते. परंतु अशा प्रकारच्या सुचना कधीच लावण्यात आल्या नव्हत्या. परवानगी न घेता वृक्ष तोड केली असेल तर तत्काळ गुन्हे दाखल करावे. परवानगी दिली असेल तर त्याचीही चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता भुखंडामधील वृक्ष तोडण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरील वृक्षतोडीसाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महानगरपालिकेनेही दखल घ्यावी
नेरूळ एलपी येथे केलेली वृक्षतोड एमआयडीसीच्या क्षेत्रामधील असली तरी वृक्षलागवड महानगरपालिकेने केली होती. यामुळे महानगरपालिका आयुक्तांनीही याविषयी दखल घ्यावी व संबंधीतांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
महानगरपालिकेने रस्ता रूंदीकरण करताना वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेतली होती. ते वृक्ष अचानक तोडण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासास कोण जबाबदार आहे याची चौकशी करावी व संबंधीतांवर कडक कारवाई करावी. प्रशासनाने कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
चंद्रकांत आगोंडे, माजी परिवहन समिती सभापती,नवी मुंबई महानगरपालिका