खारफुटीची कत्तल, याचिका दाखल करा; संरक्षण समितीकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:54 AM2019-03-10T00:54:14+5:302019-03-10T00:54:40+5:30
दास्तान फाट्यावर ४५०० वृक्षांचे नुकसान
नवी मुंबई : उरण तालुक्यामधील दास्तान फाटा येथे पाणथळ जमीन व खारफुटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. येथील महामार्गासह इतर कामे थांबविण्यात येऊन पर्यावरणाचे नुकसान थांबवावे, असे आदेश खारफुटीच्या संरक्षणासाठी स्थापन केलेल्या समितीने दिले आहेत; परंतु यानंतरही प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नसल्यामुळे संबंधितांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
जेएनपीटी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दास्तान फाटा येथे रुंदीकरणासाठी पाणथळ जमिनीवर खोदकाम केले आहे. येथील खारफुटीला मिळणारे खाडीचे पाणी थांबविण्यात आले आहे. यामुळे साडेचार हेक्टर जमिनीवरील तब्बल ४५०० खारफुटीचे वृक्ष सुकले आहेत. पाणथळ जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पक्षी व इतर जैवविविधतेचे नुकसान झाले आहे.
पर्यावरणाची हानी थांबविण्यात यावी. खारफुटी नष्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. नेचर कनेक्ट संस्थेचे बी. एन. कुमार, श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार व पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीचे दिलीप कोळी व इतर पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी एका वर्षापासून जेएनपीटी, महामार्ग प्राधिकरण महसूल विभाग व राज्य शासनाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. खारफुटीच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीकडेही याविषयी तक्रार केली होती. समितीने दास्तान फाट्यावरील कामे थांबविण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या. पर्यावरणाचे नुकसान थांबविण्याचे आश्वासन जेएनपीटी व महसूल विभागासह महामार्ग प्राधिकरणाने दिले होते; परंतु प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही.
पर्यावरणाचे नुकसान थांबविले जात नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खारफुटी संरक्षण समितीकडेही याविषयी निवेदन दिले आहे. जेएनपीटी, महसूल विभाग व महामार्ग प्राधिकरणाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे, यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. खारफुटी संरक्षण समितीचे सदस्य स्टॅलीन डी यांनीही समितीच्या बैठकीची मागणी अध्यक्षांकडे केली असून, या बैठकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवस्मारकासाठी खोदकाम परवानगी नाही
जेएनपीटीने उरणमधील दास्तान फाटा येथे शिवस्मारक केले आहे. यासाठीही मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. या खोदकामासाठी परवानगी घेतली होती का? अशी माहिती श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी माहितीच्या अधिकारामध्ये विचारली होती. स्मारकाच्या कामासाठी खोदकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचे उत्तर उरण तहसीलदारांनी दिले आहे. यामुळे अवैधपणे उत्खनन केल्याप्रकरणी संबंधितांवरही कारवाईची मागणी केली आहे.