पनवेल : शहरातील शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी सुरू असलेल्या कामांसाठी झाडांची मोट्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पनवेल महापालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुशोभीकरणात महाराजांच्या पुतळ्याच्या सभोवताली किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
याकरिता सोमवारी परिसरातील जवळपास १० ते १५ झाडांची कत्तल या वेळी करण्यात आली. यामध्ये आंबा, अशोका आदी झाडांचा समावेश होता. संबंधित झाडे तोडण्यासाठी पालिकेने परवानगी दिली असली तरी सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित झाडे न तोडताही परिसराचे सुशोभीकरण करता आले नसते का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.