नवी मुंबई : लॉकडाऊननंतर हळूहळू विविध गोष्टी खुल्या केल्या जात असून, राज्यात अनलॉक पाचची घोषणाही करण्यात आली आहे. गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. कोरोनाच्या भीतीनेहूी अनेक प्रवासी रिक्षा प्रवास टाळत असून, रिक्षा व्यवसायात मंदी आली असून, रिक्षाचालक चिंतेत आहेत.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट अवलंबून असलेल्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नवी मुंबई शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामधील अनेक रिक्षाचालक भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य करीत असून, भाड्याच्या रिक्षा चालवितात. सध्या व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल सेवा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक खासगी वाहने, तसेच बसने प्रवास करत आहेत. लोकल सेवा बंद असल्याने रेल्वे स्थानकांपर्यंत रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी नसल्याने, तसेच बस स्टॉप सोसायट्यांपासून काही अंतरावर असल्याने रिक्षाचा प्रवास टाळला जात आहे.
शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत. रिक्षा स्टँडवर तासन्तास प्रतीक्षा करूनही प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालक चिंतेत आहेत. विविध कारणांमुळे रिक्षाच्या व्यवसाय मंदी असून, व्यवसाय सुरू होऊनही रिक्षाचालकांना उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे.स्थानकांजवळील रिक्षा स्टँड ओसकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय रेल्वे स्थानकात ये-जा करणारे इतर प्रवासी नाहीत. त्यामुळे शहरातील रेल्वे स्थानकाबाहेरील अनेक रिक्षा स्टँड ओस पडले आहेत.