नामदेव माेरे -
नवी मुंबई : शासनाने एमआयडीसीमधील सर्व उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता व कच्चा माल मिळत नसल्याॐए उत्पादनक्षमता ५० टक्क्यांवर आहे. उद्योग टिकविताना तारेवरची कसरत होत आहे. राज्यातील सर्वात प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे- बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये जवळपास ५ हजार छोटे-मोठे व तळोजामध्ये जवळपास १६२२ कारखाने आहेत. तीन लाखपेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला आहे. दुसरी लाट सुरू झाल्यानंतरही शासनाने उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु इतर समस्यांमुळे उद्योगांचे चाक गाळातच रुतत चालले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने इंजिनिअरिंग उद्योग जवळपास ठप्प झाला आहे. कोरोनाच्या भीतीने कामगार गावाकडे गेल्यामुळे पुरेसे मनुष्यबळ नाही. कच्चा माल मिळत नाही. उद्योगांना माल पोहोचविणारे व्यवसाय बंद आहेत. या सर्वांचा परिणाम उद्योगांवर होत आहे. लहान उद्योजकांचे कंबरडे मोडत असून, आर्थिक स्थिती खालावत आहे. पूर्णक्षमतेने व्यवसाय सुरू झाले, तरच उद्योग टिकविणे शक्य होणार आहे.
ऑक्सिजनचा परिणामकारखान्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा जवळपास बंद आहे. ऑक्सिजनच मिळत नसल्यामुळे फॅब्रिकेशन व इतर इंजिनिअरिंगची कामे बंद आहेत. जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होणार नाही, तोपर्यंत कारखानेही सुरू होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वाहतुकीचा प्रश्नऔद्योगिक वसाहतीमध्ये मुुंबई, ठाणे व इतर परिसरातून अनेक कामगार येतात. या कामगारांना रेल्वे व बसने प्रवास करता येत नाही. यामुळे कामगारांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असून, त्याचा परिणामही उद्योगांवर होत आहे.
ठाणे- बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने सुरू आहेत. परंतु कच्चा माल मिळत नाही. मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.- एम. एम. ब्रम्हे सचिव, टीबीआयए
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ऑक्सिजन गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. उद्योग सुरू आहेत. परंतु गॅस, मनुष्यबळ व इतर साहित्याचा पुरवठा होत नसल्यामुळे अपेक्षित उत्पादन होत नाही.- के. आर. गोपी अध्यक्ष - टीएमआयए
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील व्यवसाय सुरू आहेत. परंतु उद्योगांना कच्चा माल व इतर साहित्य पुरविणारे व्यवसाय बंद असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. वाहतूक, गॅसपुरवठा व इतर अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे.- सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन
कच्चा माल कोठून आणायचा?एमआयडीसीमधील कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु कारखान्यांना कच्चा माल पुरविणारे व्यवसाय बंद ठेवले आहेत. यामुळे कच्चा माल आणायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांसाठी लागणारे हार्डवेअर व इतर साहित्यही मिळत नाही. यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम होऊ लागला आहे.