नालेसफाईनंतर गाळ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:30 PM2020-02-11T23:30:43+5:302020-02-11T23:30:54+5:30
कळंबोलीतील रहिवाशांमध्ये नाराजी : सिडकोचे दुर्लक्ष; ठेकेदाराकडून कामात कुचराई
कळंबोली : वसाहतीचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतर करण्याआधी सिडकोने काही कामे हाती घेतली आहेत. कळंबोली वसाहतीत दहा कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डागडुजी केली जात आहे. पावसाळी गटारांमधील गाळ-कचरा, माती काढण्यात आली आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून काढलेला गाळ रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे ही माती पुन्हा गटारांमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती सुकल्यामुळे सर्वत्र धूळ उडत आहे. सिडकोचे ठेकेदारावर नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
कळंबोली वसाहतीला अनेक समस्यांनी वेढले आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पथदिवे बंदावस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची समस्या अद्याप निकाली निघालेली नाही. अशा अनेक अडचणीत कळंबोलीतील रहिवासी सध्या राहत आहेत. त्यातच इतर वसाहतीप्रमाणे कळंबोलीसुद्धा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार काही छोटी-मोठी कामे सिडको करून देणार आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांची निविदा काढून एजन्सी नेमण्यात आली आहे.
वसाहतीमध्ये पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत. त्यांची मान्सूनपूर्व साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने ते सर्वच ठिकाणी तुंबत असल्याचे उघड झाले आहे. सिडकोने ही सर्व गटारे माती, चिखल, डेब्रिज, कचरा, प्लास्टिकमुक्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने कामाला सुरुवातही केली आहे.
ठेकेदाराने सध्या कळंबोली टपाल कार्यालय ते अय्यप्पा मंदिर रस्त्यालगतच्या गटारांची सफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माती-चिखल, गाळ काढण्यात आला असून रस्त्यावर त्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय एनएमएमटी बस डेपो ते एसबीआय चौकापर्यंत नाले सफाई करण्यात आली आहे. त्यामधील गाळही उचलण्यात न आल्याने अनेक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. के एल टाइपच्या घरांसमोर सध्या मातीचे ढिगारे दिसू लागले आहेत.
काही ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला चिखल सुकून गेला आहे. वाहनांची सततची वर्दळीमुळे ही धूळ उडत असून, त्याचा पादचारी आणि आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत आहे. तसेच बाहेर काढण्यात आलेली माती पुन्हा गटारांमध्ये जात आहे. माती आणि चिखल बाहेर काढल्यानंतर तो त्वरित उचलावा, अशी मागणी रहिवासी राजेंद्र बनकर यांनी केली आहे.
मद्याच्या बाटल्यांचा खच
कळंबोली वसाहतीमध्ये पावसाळी गटारांमधील साफसफाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गटारे साफ करीत असताना माती, प्लास्टिक व इतर वस्तू निघतातच; परंतु सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या समोरील गटारामध्ये मोठ्या प्रमाणात बीअर आणि दारूच्या बाटल्या निघाल्या.
त्याचा ढीग पदपथावर पडून आहे. शाळेच्या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी मद्यप्राशन करून बाटल्या गटारात फेकून देत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी केली आहे.