आविष्कार देसाई, अलिबागदेशभर स्मार्ट सिटीचा गवगवा सुरू असताना ग्रामीण भाग विकासाच्या नवनवीन योजनेपासून वंचित राहतो की काय असे वाटत होते. मात्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील ही भीती आता दूर केली आहे. जिल्ह्यात स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडे योजनेबाबत सरकारने निकष मागविले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या तुलनेत आता स्मार्ट ग्राम योजनेने गावाचा चेहरामोहरा बदलण्यास निश्चितच मदत होणार आहे.विकासाच्या नवनवीन संकल्पना राबविण्यावर सरकारने भर दिला आहे. त्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनातील घटकांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे योजनांचा पाऊस पाडताना उपलब्ध मनुष्यबळाचा विचारही सरकारने करण्याची गरज असल्याचे बोलले जाते.शहराचा विकास अत्याधुनिक पध्दतीने करण्यावर भर देताना तेथे हायटेक सुविधा पुरवून विकासाला नवा आयाम देण्यावर सरकारने भर दिला आहे. ग्रामीण भागात वीज, पाणी, रस्ते याच्याही पलीकडे विकास कसा असायला पाहिजे याची विचारणा नुकतीच सरकारने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांकडे विकासाचे निकष मागविण्यात आले असल्याचे कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.स्मार्ट गावासाठी किती निधी लागणार आहे, किती गावे यादीत घ्यायची आहेत यावर विचार होणे बाकी आहे. विकासाच्या आराखड्याची माहिती सरकारला दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्मार्ट ग्राममध्ये निर्मल पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, पर्यावरणाचा विकास रत्न पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार यांच्यासह आदी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा समावेश होणार आहे. त्यानंतर गावाची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती आणि पेसाअंतर्गत आदिवासीबहुल ग्रामपंचायतींचा समावेश स्मार्ट ग्राम योजनेत होणार आहे.
रायगड जिल्ह्याचा होणार स्मार्ट विकास
By admin | Published: November 26, 2015 1:54 AM