नवी मुंबई, पनवेलमध्ये हुक्का पार्लरवरील कारवाईनंतरही निघतोय धूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:46 AM2021-03-08T01:46:07+5:302021-03-08T01:46:38+5:30
तरुणाई नशेच्या अधीन ; कारवाईचे अधिकार कोणाला?
सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्मार्ट सिटीला हुक्का पार्लरचे ग्रहण लागत चालले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर व पब चालत असून, त्यात महाविद्यालयीन तरुण-तरुणी हुक्क्याच्या नशेच्या अधीन होत आहेत, तर पोलिसांकडून कारवाई होऊनही काही मिनिटांतच पुन्हा हुक्क्याचा धूर निघत असल्याने कारवाईचे अधिकार नेमके कोणाला, असा प्रश्न उद्भवत आहे.
नवी मुंबईसह पनवेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत हुक्का ओढत धुरांचे लोट सोडणे तरुणांमध्ये फॅशन समजली जाऊ लागली आहे. याचाच पुरेपूर फायदा हुक्का पार्लर व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. तरुण-तरुणांना आकर्षण ठरेल, अशी जाहिरातबाजी किंवा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार, मध्यरात्रीपर्यंत शहरातील हुक्का पार्लरमध्ये तरुणाई रमत आहे. अशाच प्रकारे सुमारे २०० मुलांच्या पार्टीवर शनिवारी रात्री पोलिसांनी कारवाई केली. एपीएमसीमधील क्लब नशा या ठिकाणी ही गर्दी जमली होती. याची माहिती मिळताच, उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली. मात्र, कारवाई संपताच अर्ध्या तासात पुन्हा हुक्क्याच्या तलबेने आलेल्यांची बैठक रंगू लागली.
मागील काही दिवसांत नवी मुंबईसह पनवेलमध्ये अनेक ठिकाणी हुक्का पार्लरवर कारवाई झाली आहे. त्यानुसार, कोपरखैरणे, खारघर व कामोठेमधील काही हुक्का पार्लर तूर्तास बंद झाले आहेत. मात्र, एपीएमसी आवारातील हुक्का पार्लर पोलिसांच्याही कारवाईला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
स्वतंत्र हुक्का पार्लरसाठी परवानगी नसल्याने हॉटेलच्या नावाने पालिकेचा परवाना घेऊन, त्या ठिकाणी हुक्का पार्लर चालविले जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला महापालिकेने हातभार लावल्यास शहरातून हुक्का पार्लर हद्दपार होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात महापालिका आणि पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
पालिकेची डोळेझाक?
बहुतांश ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली परवाना घेऊन हुक्का पार्लर चालविले जात आहेत. यामुळे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर, त्या आस्थापनेचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविले जात आहेत. यानंतरही अशा आस्थापनांवर कारवाईत पालिका अधिकारी चालढकल करत असल्याची खंत पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
ठोस कायद्याची गरज
फैलावत चाललेली हुक्का पार्लर संस्कृती मोडीत काढण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे. हुक्का पार्लरला परवाना नसला, तरीही कारवाईचे अधिकार कोणाचे याची स्पष्ट नियमावली नाही. त्यामुळे पोलिसांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमलेल्या गर्दीचा आधार घेत कारवाई केली जात आहे, तर काही ठिकाणी हर्बल हुक्का वापरत असल्याची कारणे पुढे करून कारवाई टाळली जात आहे.
सीबीडीचे धमाका लाउंज सील
सीबीडी सेक्टर १५ येथील धमाका लाउंजमध्ये शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती. त्यांच्याकडून ग्राहकांमध्ये कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर ठेवले जात नव्हते. यामुळे महापालिका विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या पथकाने लाउंज सील करून कारवाई केली आहे. अशाच प्रकारे इतरही ठिकाणी पालिकेने कारवाईत पुढाकार घेतल्यास हुक्का पार्लर चालकांचे धाबे दणाणू शकतात.
बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हुक्का पार्लरवर कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी महाविद्यालयीन मुला-मुलींच्या पार्ट्या रंगत आहेत. अशा ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव महापालिकेकडे पाठविले जात आहेत.
- सुरेश मेंगडे,
पोलीस उपायुक्त, परिमंडळ १