जळत्या मृतदेहांचा धूर शोकाकुलाच्या तोंडावर; चिमणी बंद असल्याने स्मशानभूमीतच धुराचे लोट
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 5, 2024 07:07 PM2024-02-05T19:07:36+5:302024-02-05T19:08:23+5:30
तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई: तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मृतदेहाला अग्नी देण्याच्या ठिकाणी छताच्या चिमणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे अंत्यविधीवेळी होणारा धूर चिमनीवाटे हवेत जाण्याऐवजी शोकाकुळ नागरिकांमध्येच पसरत आहे. त्यामुळे अगोदरच दुःखात असलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात धूर फेकून अधिक त्रास देण्याचे काम त्याठिकाणी होताना दिसत आहे.
महापालिकेने स्मशान भूमी व्हिजन अंतर्गत शहरातील स्मशानभूमींवर लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारातून मागील दहा दिवसांपासून तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी दुपारी त्याठिकाणी एकाच वेळी चार मृतदेहांवर अंत्यविधी केला जात होता. त्यासाठी चारही कुटुंबियांच्या परिचितांनी मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली होती. मात्र मृतदेहांना अग्नी देताच निघणारा धूर हवेत न जाता जमिनीवर पसरू लागला. यामुळे उपस्थितांना एक एक पाऊल मागे जावे लागले.
मात्र धूर अधिकच पसरू लागल्यानंतर काहींनी चौकशी केली असता तिथली चिमणी बंद असल्याचे कारण समोर आले. मागील दहा दिवसांपासून स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या शेडची चिमणी बंद असल्याने हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना फोन करण्यास सुरवात केली असता अनेक अधिकाऱ्यांना तिथली चिमणी बंद असल्याचे माहित देखील नसल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. शिवाय तुर्भे स्मशानभूमीत तीन कामगार असतानाही त्याठिकाणी अंत्यविधीची बहुतांश कामे हि शोकाकुळ कुटुंबीयांकडूनच करून घेतली जात असल्याचेही समोर आले. दरम्यान स्मशानभूमीत पसरणाऱ्या धुराबाबत पालिकेचे अभियंता विश्वकांत लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरुस्तीसाठी चिमणी बंद असून पुढील तीन दिवसात तिचे काम होईल असे सांगितले.
दहा दिवसांपासून स्मशानभूमीची चिमणी बंद असतानाही अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती नाही यावरून त्यांची अकार्यक्षमता सिद्ध होत आहे. अंत्यविधीच्या धूर हवेत जाण्याऐवजी थेट नागरिकांच्या तोंडावर येत असल्याने अग्नी देऊन स्मशानभूमी बाहेर पाऊल टाकावे लागत आहे. प्रशासनाने हि बाब गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. - गोविंद साळुंखे- सामाजिक कार्यकर्ते.