धुवाधार पावसाने शहराला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:10 AM2017-07-19T03:10:45+5:302017-07-19T03:10:45+5:30

आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी आणि मंगळवारी नवी मुंबई परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या

Smoky rains thundered the city | धुवाधार पावसाने शहराला झोडपले

धुवाधार पावसाने शहराला झोडपले

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी आणि मंगळवारी नवी मुंबई परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाडांची पडझड सुरुच आहे. झोपडपट्टी परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर पडला आहे. शहरातील खड्डे, रेल्वेस्थानक, बस स्थानकांची गळती, शासकीय कार्यालयातील गळक्या भिंतींमुळे आदी समस्यांनी नवी मुंबईकर हैराण झाले आहेत.
सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे वातावरणातही बदल झाला असून रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. महापालिका, खासगी रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढल्याने दिसून येत असून यामध्ये साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. तापाच्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली महापालिकेच्या वतीने हिवताप,मलेरिया प्रतिबंधक मोहीम राबविली जात आहे. उघड्यावरच्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर परवाना विभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, महत्त्वाचे चौक, उड्डाणपुलाखाली बिनधास्तपणे उघड्यावरच्या पदार्थांची विक्री केली जात आहे. या अन्नपदार्थामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असली तरी देखील अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात नसल्याचे पहायला मिळते.

मोरबे धरण परिसरात पाऊस
मोरबे धरण परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून आतापर्यंत १८९६.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरणाची जलपातळीत आठवडाभरात तीन ते चार मीटर इतकी वाढ झाली असून सोमवारी मोरबे धरणाची पातळी ८२ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायं. ६ वाजेपर्यंत बेलापूर परिसरात ४३.९मिमी, नेरुळमध्ये, ५०.०, वाशीत ५५.४, ऐरोलीत ५६मिमी अशा सरासरी ५१.४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई परिसरात सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अग्निशमन तसेच महापालिका आपत्कालीन विभागाची मदत घेण्यात आली असून वृक्ष उन्मळून पडलेल्या ठिकाणीही त्वरित मदत पोहोचविण्यात आल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली.

१९२ झाडांची पडझड
महापालिका आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरात शहरात १९२ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी आल्या असून याठिकाणी आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मार्ग मोकळा करून देण्यात आला. तर शहरातील १५ सखल भागांमध्ये पाणी साचल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली आहे.

लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने
पनवेल-सीएसटी दरम्यान लोकल वाहतूक खोळंबली होती. सकाळच्या वेळी पनवेल ते सीएसटी दरम्यानच्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. रुळावर पाणी साचल्याकारणाने लोकल धीम्या गतीने सुरू होत्या. गळतीमुळे प्रवाशांना फलाटावरही छत्री घेऊन उभे रहावे लागत आहे.

छत्र्या घेऊन काम
कोपरखैरणे महापालिकेच्या प्रभागीय कार्यालयातील एलबीटी विभागाची दुरवस्था झाली असून कर्मचाऱ्यांना छत्रीचा आधार घेत काम करावे लागत आहे. गळके छप्पर, कार्यालयाची दुरवस्था,ओलाव्यामुळे खराब झालेले लाकडी फर्निचर यामुळे महत्त्वाचे कागदपत्र, फाईल्स सुरक्षित ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्लास्टीकचा वापर करावा लागतो. अशावेळेस महत्त्वाची कागदपत्रे भिजल्यास त्याला जबाबदार कोण़्ा?

धोक्याचा प्रवास
शहरातील खड्ड्यांमुळे त्रस्त नवी मुंबईकरांना खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे गाड्या बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दररोज महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याच्या प्रकाराने प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागते आहे. पावसाळ््यापूर्वीच मलमपट्टी केलेले रस्त्यावर देखील खड्डे पडले असून निष्कृष्ट कामाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

मेनहोलमुळे अपघात
खारघर रेल्वे स्थानकाबाहेरील सबवेजवळ असलेला खुला मेनहोल सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर अनेक चालकांची वाहने मॅनहोलमध्ये अडकत असल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. मेनहोलला झाकण बसविण्याकडे सिडकोचे दुर्लक्ष झाले असून त्यामुळेच अपघात होत आहेत. लवकरात लवकर मेनहोलवर झाकण बसविण्याची मागणीही परिसरातील नागरिक करीत आहेत. खारघर सेक्टर चारमधील सर्व्हिस रोडवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून चालकांकडून या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मात्र याठिकाणी असलेल्या खुल्या मेनहोलमुळे अपघात होत आहेत. अनेक दुचाकी याठिकाणी अडकत असून चालक जखमी होत आहेत. सिडको प्रशासन याबाबत गंभीर नसून तुटलेल्या झाडाची फांदी याठिकाणी लावून सावधानतेचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Web Title: Smoky rains thundered the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.